मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीच्या काळात महामुंबईत आगीच्या घटनांनी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि विरार परिसरात आगीच्या सात घटना घडल्या. यामध्ये कासारवडवली येथे एकाच कुटुंबातील तिघांसह चार जण भाजले. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रहेजा गार्डनमधील इमारतीला लागलेल्या आगीत ३० रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली, तर १५ ते १६ जणांना इमारतीतील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. इतर घटनांमध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रहेजा गार्डनमधील कारलाईन इमारतीला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. इमारतीच्या आठव्या मजल्यावर सुरू झालेल्या आगीने पाहता पाहता चौदाव्या मजल्यापर्यंत मजल मारली. आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. काही कुटुंबे वरच्या मजल्यांवर अडकली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
इमारतीत अडकलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांना टेरेसच्या दिशेने जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. या मोहिमेत ३० रहिवाशांची सुरक्षित सुटका करण्यात आली, तर अन्य १५ ते १६ रहिवाशांना इमारतीतच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या देखरेखीखाली अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याचे सूत्रांनी सांगितले.
कासारवडवलीत एकाच कुटुंबातील तिघे जखमी
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील सांघवी हिल्स परिसरातील आरावली हिल्स सोसायटीच्या ए विंगमध्ये रविवारी रात्री आग लागली. सातव्या मजल्यावर घडलेल्या या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांसह चार जण भाजले. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
उल्हासनगरमध्ये कचऱ्याच्या ढिगाला आग
उल्हासनगरमध्ये तब्बल सहा लाख मेट्रिक टन कचऱ्याच्या ढिगाला आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आणि संपूर्ण परिसर धुराने व्यापला गेला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
मुंबईतील डोंगरी, मरोळ आणि प्रभादेवीतही घटना
दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात रविवारी रात्री हाजी कासम चाळीतील एका गॅरेजला आग लागली. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
अंधेरी पूर्वेकडील मरोळ मिलिटरी रोड परिसरातही रविवारी रात्री एका गॅरेजला आग लागली. मात्र, या आगीची तीव्रता फारशी मोठी नव्हती.
प्रभादेवी येथील कामगार मैदानाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामात रविवारी सकाळी आग लागली. गोदामात मंडप सजावटीसाठी ठेवलेल्या साहित्याने पेट घेतल्याने लाकूड, बांबू आणि अन्य ज्वलनशील सजावटीचे साहित्य जळून खाक झाले.
विरारमध्ये फ्लॅटला भीषण आग; फटाक्यांमुळे आग लागल्याचा अंदाज
विरार पश्चिमेकडील एचडीआयएल सोसायटीमध्ये रविवारी रात्री दहाच्या सुमारास एका फ्लॅटला भीषण आग लागली. पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीच्या ज्वाळा वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचत होत्या. फटाक्यांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. संबंधित मजल्यावरील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.
रविवारी एकाच दिवशी महामुंबईतील विविध भागांत आगीच्या सात घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः उंच इमारतींमधील आगीच्या घटनांमुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


