कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीनंतर महायुती सरकारने केलेल्या पाच तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीवरून कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकत बहुमत मिळवणाऱ्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी या नियुक्त्यांविरोधात रस्त्यापासून न्यायालयापर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
आज आयोजित संघर्ष मोर्चात बोलताना सतेज पाटील यांनी महायुती सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. विशेष म्हणजे, भाषणाच्या पहिल्याच १० ते ११ मिनिटांत त्यांनी शासन नियुक्त संचालकांची नावे जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. सरकारने या नियुक्त्यांचा शासन निर्णय (जीआर) अद्याप सार्वजनिक केला नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनातील सूत्रांकडून ही नावे समजल्याचा दावा केला.
शासन नियुक्त संचालकांची नावे सभेतच जाहीर
सतेज पाटील यांनी सभेत वाचून दाखवलेल्या माहितीनुसार, शिवाजी अडनाईक, डॉ. प्रवीण हेंद्रे, कृष्णात पाटील आणि सांगली येथील ॲड. प्रशांत पाटोळे यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने अद्याप अधिकृत जीआर अपलोड केलेला नसतानाही प्रशासनातील लोकांनी आपल्याला ही नावे सांगितल्याचा दावा त्यांनी केला.
‘सांगलीतील व्यक्तीला गोकुळमध्ये संचालक कसे केले?’
संचालकांच्या नावांची घोषणा केल्यानंतर सतेज पाटील यांनी महायुती सरकारला थेट सवाल केले. सांगली जिल्ह्यातील व्यक्तीची कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर संचालक म्हणून नियुक्ती कशी होऊ शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकही पात्र व्यक्ती, तज्ज्ञ किंवा दूध उत्पादक सरकारला मिळाला नाही का, अशी विचारणाही त्यांनी केली.
तसेच स्त्रीरोगतज्ज्ञांची गोकुळच्या संचालकपदी निवड करण्यामागचे कारण काय, त्यांना दूध संघाच्या कामकाजाची कितपत माहिती आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या नियुक्त्यांमधून सरकारचा नेमका हेतू काय आहे, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
‘गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्याचा डाव’
पाच तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीचा मुद्दा केवळ पदवाटपापुरता मर्यादित नसून कोल्हापूरच्या सहकार क्षेत्राला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी केला.
सांगलीतील तज्ज्ञांची गोकुळमध्ये नियुक्ती करून दूध संघाला अमूलच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. कोल्हापूरचा स्वाभिमानी सहकार आणि गोकुळ दूध संघ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून होत असल्याचा आरोप करत, हा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा ठाम इशाराही सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चातून दिला.


