कोल्हापूर प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या राजकारणातील संघर्ष आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीने बाजी मारल्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेला शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी तितक्याच आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ‘सतेज पाटलांचे वडील स्कुटरवर फिरायचे, पण तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का?’ असा खोचक सवाल करत धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केले. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी आमदार राजेश पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांचा १६ विरुद्ध १३ मतांनी पराभव केला. शासननियुक्त चार संचालकांच्या मतदानामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे गणित बदलले आणि महायुतीला गोकुळच्या सत्तेवर झेंडा फडकवता आला. मात्र, या निकालानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
चंद्रकांत पाटलांची सतेज पाटलांवर टीका
अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘बंटी तू बंटीच राहिलास, कधी साहेब झाला नाहीस,’ अशा शब्दांत त्यांनी सतेज पाटलांची खिल्ली उडवली. सतेज पाटील यांच्या कुटुंबाच्या संपत्तीत झालेल्या वाढीवर प्रश्न उपस्थित करताना, एकेकाळी त्यांचे वडील डी. वाय. पाटील कोल्हापुरात स्कुटरवर फिरायचे, मग आज एवढी संपत्ती कुठून आली, असा सवाल त्यांनी केला. गोकुळची सत्ता दूध उत्पादकांच्या हितापेक्षा मलई खाण्यासाठीच हवी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
धंगेकरांचा जुन्या दिवसांचा दाखला
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाचा समाचार घेताना रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या जुन्या राजकीय संघर्षाच्या दिवसांची आठवण करून दिली. सतेज पाटील यांचे वडील स्कुटरवर फिरायचे, हे ठीक आहे; मात्र महाराष्ट्राने तुमचीही परिस्थिती पाहिली आहे, असे म्हणत धंगेकर यांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केले.
‘तुम्ही शबनमची झोळी घेऊन हॉटेलच्या बाहेर कोणीतरी आत नेऊन चहा पाजेल का, याची वाट पाहत बसायचात. तुमची परिस्थितीही या महाराष्ट्राने पाहिली आहे. मग तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का?’ असा बोचरा सवाल धंगेकर यांनी केला.
‘नळावरच्या भांडणासारखे राजकारण करू नका!’
धंगेकर यांनी केवळ संपत्तीच्या मुद्द्यावरच नव्हे, तर चंद्रकांत पाटील यांच्या भाषाशैलीवरही टीका केली. हे सगळे नळावरच्या भांडणासारखे सुरू आहे. मी हे करेन, ते करेन, अशा दमदाटीच्या भाषेला लोकशाहीत स्थान नाही, असे ते म्हणाले.
सत्ता कोणाची कायमस्वरूपी मक्तेदारी नसते. सत्ता कोणाची मांडलिक नसून आज एका ठिकाणी असते, तर उद्या दुसरीकडे जाते. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेले नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.
‘तुम्ही जी दमदाटी करत आहात, ती जनता पाहत आहे. लोक चौकाचौकात तुमचे मनगट धरतील, तेव्हा उत्तर देताना नाकीनऊ येतील. तुमचे केस एका बाजूला, धोतर दुसऱ्या बाजूला आणि चष्मा वेगळ्या बाजूला पडेल, तो काळ फार दूर नाही,’ अशा आक्रमक शब्दांत धंगेकर यांनी सुनावले. हा महाराष्ट्र शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा आहे. येथे दमदाटी चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळचा निकाल लागला; पण राजकीय संघर्ष कायम!
दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली असली तरी या सत्तासंघर्षाला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचा आणि त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शासननियुक्त चार संचालक तीन महिन्यांत राजीनामा देतील, असा दावाही सतेज पाटील यांनी केल्याचे वृत्त आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश पाटील यांनी मात्र विरोधकांनाही सोबत घेऊन दूध उत्पादकांच्या हितासाठी काम करण्याची भूमिका मांडली आहे. गोकुळचा कारभार, शासननियुक्त संचालकांचा प्रश्न आणि न्यायालयीन लढाई या मुद्द्यांवरून पुढील काळातही कोल्हापूरचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. त्यात आता चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्या शाब्दिक युद्धाची भर पडल्याने गोकुळचा सत्तासंघर्ष केवळ सहकारापुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणाचा चर्चेचा विषय बनला आहे.


