स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात दिंडोशी पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका आरोपीकडून ६४० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी २८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४.४० वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्वेतील फिल्म सिटी रोडवरील हनुमान नगर परिसरात सॅटेलाइट टॉवरजवळ एक व्यक्ती पाठीवर निळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पदरीत्या उभी असल्याचे अंमली पदार्थविरोधी पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली असता तो बॅगेत काहीतरी लपवत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने त्याला ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या उपस्थितीत पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत बॅगेमध्ये ६४० ग्रॅम मेफेड्रॉन आढळले. या प्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११७१/२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करून २७ ऑक्टोबर रोजी त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे आणि पोलीस निरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोळुरे, पोलीस हवालदार प्रदीप मोरे तसेच पोलीस शिपाई प्रवीण चव्हाण आणि नवनाथ शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.


