पुणे प्रतिनिधी
पुणे : जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे ३६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओतूर ते नाशिकदरम्यानच्या सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून पोलिसांनी या घरफोड्यांचा छडा लावला. पोलिसांच्या या यशस्वी तपासामुळे परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
१५० सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित कारचा माग
ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ओतूरपासून नाशिकपर्यंतच्या मार्गावरील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. या तांत्रिक तपासातून गुन्ह्याशी संबंधित संशयित कारची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर संबंधित वाहनाचा माग काढत पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या तपासातून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आले.
घरफोडी करणारे तिघे, चोरीचा माल विकत घेणारा चौथा आरोपी
या प्रकरणात वसीम मुनीर पठाण (वय २९), अदनान युनुस पठाण (वय २६) आणि सोनू उर्फ मोहम्मद शारीफ रसूल शेख (वय ४०) या तिघांना अटक करण्यात आली आहे. हे तिघेही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव परिसरातील रहिवासी आहेत.
चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सागर अशोक शिंदे (वय ३०) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. अशा प्रकारे घरफोडीच्या गुन्ह्यांशी संबंधित चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
सोन्याचे दागिने, चांदी, रोख रक्कम आणि कार जप्त
पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये १९ तोळे सोन्याचे दागिने, २ किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख, गुन्ह्यांसाठी वापरलेली कार आणि वायरलेस वॉकी-टॉकी यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३६ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे जुन्नर तालुक्यातील घरफोडीच्या घटनांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले असून, या टोळीचे आणखी काही गुन्ह्यांशी संबंध आहेत का, याचा तपास करण्याच्या दृष्टीनेही ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्यासह पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.


