मुंबई प्रतिनिधी
मुंबई : कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा मुद्दा तापला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सायडोंगरावर जाऊन वृक्षतोडीची पाहणी केली. दुसरीकडे, अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनीही या प्रकल्पाला विरोध दर्शवत पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प होऊ देणार नसल्याचा इशारा दिला.
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या पायथ्याशी प्रस्तावित असलेल्या या प्रकल्पासाठी ३५ हजारांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांत शेकडो झाडे तोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक नागरिक आणि विविध माध्यमांमधून हा विषय समोर आल्यानंतर राज्यभरातून वृक्षतोडीविरोधात संताप व्यक्त होत आहे.
सयाजी शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सरकारच्या वृक्षलागवडीच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले. सरकार एका बाजूला वृक्षलागवडीबाबत बोलते, तर दुसरीकडे सह्याद्रीच्या परिसरातील झाडे तोडली जात असल्याची टीका त्यांनी केली. कोणत्याही प्रकल्पाच्या नावाखाली सह्याद्रीचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जुनी झाडे तोडल्यामुळे जंगलातील वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचा समतोल बिघडत असताना असे प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत का उभारले जात नाहीत, असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला. कोकण आणि सह्याद्रीच्या पट्ट्यातच निसर्गाची हानी का केली जाते, असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला.
गेल्या ५० ते १०० वर्षांपासून जतन केलेली जुनी आणि ऐतिहासिक झाडे विविध प्रकल्पांसाठी तोडली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प होऊ देणार नसल्याचे स्पष्ट करत, गरज पडल्यास वृक्षतोडीविरोधात राज्यभर मोठी मोहीम उभारली जाईल, असा इशाराही सयाजी शिंदे यांनी दिला.


