मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विद्याविहार, शीव आणि गोरेगाव पूर्व येथील तीन महत्त्वाच्या पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार राजहंस सिंह, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Mumbai Moves Faster with New Flyovers!
Glad to inaugurate various flyovers under the Brihanmumbai Municipal Corporation, including the Vidyavihar east-west connecting railway overbridge, flyover at the Sion railway station and the flyover from Ratnagiri Junction to Santosh Nagar… https://t.co/yH1hmGcCG9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 22, 2026
मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे पूर्व-पश्चिम संपर्क अधिक सुलभ होणार असून, प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
विद्याविहार रेल्वेस्थानकावरील नवीन पूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या मार्गावरील प्रवासासाठी पूर्वी सुमारे ३० मिनिटे लागत होती. नव्या पुलामुळे हा वेळ अंदाजे १० मिनिटांवर येणार आहे. घाटकोपर स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याचीही अपेक्षा आहे. या पुलाची एकूण लांबी ६०० मीटर असून, रुंदी १५.५० ते १७.५० मीटर आहे.
शीव रेल्वेस्थानकावरील ११२ वर्षे जुना पूल असुरक्षित झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. नवीन पूल पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गाला धारावी, वांद्रे व बीकेसी परिसराशी जोडणार आहे. या पुलाच्या कामासाठी ३३.५१ कोटी रुपये, तर पोहोच रस्त्यासाठी ३१.६२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. पुलाची लांबी ५४.५ मीटर आणि रुंदी २६ मीटर आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या विस्तारासाठीही हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गिका पूर्ण झाल्यानंतर लोकल गाड्यांची संख्या आणि फेऱ्यांची वारंवारता वाढविणे शक्य होईल. पुलाचे काम नियोजित वेळेच्या सुमारे चार महिने आधी पूर्ण करण्यात आले आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव पूर्व येथील रत्नागिरी हॉटेल जंक्शन ते चित्रनगरी मार्गावरील संतोष नगरपर्यंत उभारण्यात आलेला उड्डाणपूल १.२६ किलोमीटर लांबीचा आणि सहा मार्गिकांचा आहे. या पुलामुळे रत्नागिरी हॉटेल जंक्शन, ए.के. वैद्य मार्ग आणि फिल्म सिटी रोड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील संपर्क वेगवान होऊन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखाली प्रस्तावित दुहेरी भूमिगत बोगद्यापर्यंत पोहोचणे सुलभ होईल.
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्ते, कोस्टल रोड आणि अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांचा प्रवास सुलभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


