मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलन आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. या क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे.
आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने एखाद्या व्यक्तीचा आवाज तयार करता येतो किंवा मूळ आवाजात बदल करता येतो. त्यामुळे व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खरी आहे की बनावट, हे तपासून पाहणे गरजेचे असल्याचे बन यांनी सांगितले.
या क्लिपमधील संभाषण नेमके कधी झाले, त्यातील आवाज कोणाचे आहेत आणि ही क्लिप प्रसारित करण्यामागे काही राजकीय हेतू आहे का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. केवळ ऑडिओ क्लिप ऐकून त्यातील संभाषण खरे असल्याचे मानणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात राज्याच्या गृहखात्याने आणि मुख्यमंत्री कार्यालयाने लक्ष घालावे. पोलिसांनी क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करावी आणि गरज पडल्यास विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. कोणताही आधीचा निष्कर्ष न काढता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सत्य जनतेसमोर आणावे, असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे.


