मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीतील ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून, सीजेपीला (CJP) आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका दिवसाची परवानगी दिली आहे. शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे आंदोलन होणार आहे. दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी, तसेच राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील आझाद मैदानात तिरंगा फडकवत लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.
मुंबईतील आंदोलनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आझाद मैदानावरच कार्यक्रम घेण्याच्या अटीवर पोलिसांनी आयोजकांना परवानगी दिली आहे. उपपोलीस आयुक्त मनीष कलवानिया यांनी या परवानगीला दुजोरा दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी आयोजकांनीही आंदोलन आझाद मैदानापुरतेच मर्यादित ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. समर्थकांनी पोलिसांनी निश्चित केलेल्या ठिकाणीच एकत्र यावे, असे आवाहन मुंबईतील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
दिल्लीतील जंतरमंतर परिसरात तिरंगा फडकवून आंदोलन केल्याच्या प्रकरणामुळे सध्या हा मुद्दा चर्चेत आला आहे. सीजेपीचे सहसंस्थापक आणि नेते आशुतोष रांका व सौरव दास यांनी जंतरमंतर परिसरात प्रवेश करून परवानगीशिवाय आंदोलन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. संबंधित ठिकाण आंदोलनासाठी अधिसूचित जागांच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतरही तेथे आंदोलन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर दोन्ही नेत्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या कारवाईच्या निषेधार्थ आणि अटकेत असलेल्या नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘लहरा दो तिरंगा’ मोहिमेची घोषणा केली. राष्ट्रध्वज फडकवणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय असून, तिरंगा हा देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतीक असल्याची भूमिका संघटनेकडून मांडण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांनी तिरंग्यासह सहभागी होऊन आपली भूमिका शांततापूर्ण पद्धतीने व्यक्त करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचे व्यवस्थापन, वाहतुकीवरील संभाव्य परिणाम आणि कायदा व सुव्यवस्था यांवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. परिस्थितीनुसार अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्याचीही तयारी प्रशासनाने ठेवली आहे.
दिल्लीतील आंदोलनावरील कारवाईनंतर मुंबईत होणाऱ्या या आंदोलनाकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रध्वज, लोकशाही मूल्ये आणि आंदोलन करण्याच्या अधिकाराचा मुद्दा यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.


