मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींमध्ये पाच वर्षांत १३ हजार ७८५ कोटी रुपयांची घट झाल्याने महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसरीकडे, पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सुमारे २.४४ लाख कोटी रुपयांची आर्थिक बांधिलकी स्वीकारण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक स्थिती स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अश्रफ आझमी यांनी केली आहे.
२०२१ मध्ये महापालिकेकडे ९१ हजार ६९० कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. ऑक्टोबर २०२६ मध्ये ही रक्कम ७७ हजार ९०५ कोटी रुपयांवर आली. फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२६ या काळातच ठेवींमध्ये ३ हजार ५४४ कोटी रुपयांची घट झाली. वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे आणि जल बोगदे यांसारख्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आवश्यक आहे.
चालू आर्थिक वर्षात कंत्राटदारांना सुमारे आठ हजार कोटी रुपये द्यावे लागणार असून, पुढील सात ते आठ वर्षे दरवर्षी २८ हजार कोटी रुपयांची देणी भागवावी लागण्याची शक्यता आहे. हा आर्थिक भार कसा पेलणार, प्रकल्पांसाठी निधी कुठून उभारणार आणि मुदत ठेवी कमी होण्याची कारणे काय, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी आझमी यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी महापौरांनी विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.


