मुंबई प्रतिनिधी
मुंबई : उपनगरातील वाकोला जंक्शन ते सांताक्रुझ रेल्वे स्थानकादरम्यानचा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हालचाली वेगवान केल्या आहेत. पंडित नेहरू मार्गावरील हा रस्ता मंजूर विकास आराखड्यानुसार १२० फूट रुंद करण्याचे प्रस्तावित असले, तरी तब्बल ३७० बांधकामांमुळे रुंदीकरणाच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे रस्त्यालगतच्या मालमत्तांमधील खुल्या जागा संपादित करण्यासाठी एच पूर्व विभागाने २८ नोटिसा बजावल्या आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील परवानाधारक गाळ्यांचे स्थलांतर आणि अनधिकृत गाळ्यांवरील कारवाईही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाकोला परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नाला आता वेग मिळण्याची चिन्हे आहेत.
पंडित नेहरू मार्गावरील वाकोला जंक्शन ते सांताक्रुझ रेल्वे स्थानकादरम्यानचा रस्ता ३६.६० मीटर अर्थात १२० फूट रुंदीच्या मंजूर रेषेनुसार विकसित करण्याचे नियोजन आहे. मात्र, या मार्गावरील ३७० बांधकामे रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरत आहेत. रस्ता विकासासाठी आवश्यक असलेल्या लगतच्या मालमत्तांमधील खुल्या जागा संपादित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या एच पूर्व विभागाने २८ नोटिसा जारी केल्या आहेत. याशिवाय रेल्वे स्थानक परिसरातील ८९ परवानाधारक गाळे जवळच्या परिसरात स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत २१ अनधिकृत गाळे निष्कासित करण्यात आले असून, उर्वरित काही गाळ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.
आयुक्तांच्या पाहणीनंतर प्रशासन कामाला
मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी शहर आणि पश्चिम उपनगरांतील विविध भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पदपथांची स्थिती, अतिक्रमणे, रस्त्यांची स्वच्छता, कचरा संकलन व्यवस्था, सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. सुगम्य पदपथ धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे आणि कोणत्याही अडथळ्याविना चालता यावे, यासाठी पदपथ मोकळे करण्यासह आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
एच पूर्व विभागातील पाहणीदरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा आढावा घेताना आयुक्तांनी विविध मार्गांवरील गाळ्यांच्या स्थलांतराबाबतही निर्देश दिले. कान्हुबाई देसाई मार्गावरील ८६ अधिकृत गाळे, सांताक्रुझ परिसरातील महात्मा गांधी मार्गावरील ८२ गाळे, ५० भाजीपाला विक्रेत्यांचे गाळे तसेच लोकमान्य टिळक मार्गावरील १४ गाळे स्थलांतरित करण्याची कार्यवाही करण्यास त्यांनी सांगितले. या कारवाईमुळे संबंधित मार्गांवरील वाहतूक व्यवस्था आणि पादचाऱ्यांच्या हालचाली सुलभ करण्याचा प्रयत्न आहे.
पदपथांवरील अतिक्रमणांना आवर घालण्याचे निर्देश
आयुक्त अश्विनी भिडे यांनी एच पश्चिम विभागातील सांताक्रुझ परिसरातील टिळक मार्ग आणि महात्मा गांधी मार्गावरील पदपथांचीही पाहणी केली. या मार्गांवरील अतिक्रमणे हटवून पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. स्कायवॉकवरून खाली लोंबकळणाऱ्या केबल्स काढून टाकण्याबरोबरच अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्याचे निर्देश देण्यात आले. रस्त्यावरील दुभाजकांची नियमित स्वच्छता राखून त्यांची स्थिती सुधारण्यावरही त्यांनी भर दिला.
वरळीतील आदर्शनगर मार्गावरील पदपथांची स्थिती आणि दुरुस्तीच्या कामांची पाहणी करताना नागरिकांना सुरक्षितपणे चालता येईल, अशा पद्धतीने पदपथ विकसित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांखाली साचणारा कचरा नियमितपणे साफ करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही तपासणी
जी दक्षिण विभागातील सेनापती बापट मार्गावरील जी. एल. लोडर चौकी येथे आयुक्तांनी कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या वाहनांची पाहणी केली. कचऱ्याची वाहतूक करताना वाहनांवर योग्य प्रकारे आच्छादन केले जाते की नाही, याची त्यांनी प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. रस्त्यावरील धूळ साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रश आणि इतर उपकरणांच्या कार्यपद्धतीचीही त्यांनी माहिती जाणून घेतली.
प्रसूतिगृहातील सुविधांचा आढावा
के दक्षिण विभागातील डॉ. व्ही. एन. शिरोडकर प्रसूतिगृहाला भेट देऊन आयुक्तांनी तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या औषधसाठ्याची आणि इतर सोयी-सुविधांची माहिती त्यांनी घेतली. प्रसूतिगृहात लवकरच सुरू होणाऱ्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाचीही पाहणी करण्यात आली. रुग्णांच्या उपचारांशी संबंधित माहिती आणि औषधसाठ्याच्या नोंदींचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणालीचाही त्यांनी आढावा घेतला.
एकीकडे रस्ता रुंदीकरणासाठी ३७० बांधकामांचा अडथळा दूर करण्याचे आव्हान, तर दुसरीकडे पदपथांवरील अतिक्रमणे आणि अस्वच्छतेचा प्रश्न, अशा दुहेरी आघाडीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाला काम करावे लागणार आहे. आयुक्तांच्या पाहणीनंतर दिलेल्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत वेगाने होते आणि वाकोला रस्ता रुंदीकरणाचा मार्ग कधी मोकळा होतो, याकडे आता स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.


