नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून देशभरात चर्चा सुरू असताना निवडणूक आयोगाने १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (SSR) राबविण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेसाठी १ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली असून, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि मतदार याद्यांमधील नोंदी अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे.
पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांचाही या प्रक्रियेत समावेश आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत माहिती दिली. पात्र मतदारांना, विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांना मतदार यादीत स्थान मिळावे, तसेच यादीतील नोंदींमध्ये आवश्यक सुधारणा व्हाव्यात, हा या मोहिमेचा उद्देश आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ २२ मे २०२७ रोजी संपणार आहे. मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ मार्च २०२७ मध्ये वेगवेगळ्या तारखांना पूर्ण होणार आहे. ‘लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५०’ नुसार, विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने आधी निवडणुका घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय, मिझोराम, नागालँड, दिल्ली, ओडिशा, सिक्कीम, त्रिपुरा आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. या ठिकाणी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही प्रक्रिया सध्या सुरू असल्याने किंवा नुकतीच पूर्ण झाल्याने स्थानिक हवामानाचा विचार करून पुनरीक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे वेळापत्रकही हवामानाचा आढावा घेऊन नंतर निश्चित करण्यात येईल. या भागांमध्ये अद्याप एसएसआर प्रक्रिया सुरू झालेली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एसएसआर प्रक्रियेदरम्यान, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२७ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण नागरिकांनाही आगाऊ नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे पात्रतेच्या आगामी तारखांनुसार मतदार होणाऱ्या तरुणांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे.


