सांगली प्रतिनिधी
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना न्यायालयीन प्रक्रियेत मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चर्चेत आलेल्या पडळकर यांच्या उमेदवारीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध करत विक्रम सावंत यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. संचालकपदासाठी आवश्यक असलेला दोन वर्षांचा कालावधी आणि अनुभवासंदर्भातील पात्रतेचे मुद्दे या याचिकेत उपस्थित करण्यात आले होते. या मुद्द्यांच्या आधारे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्याचा निर्णय दिला.
या निर्णयामुळे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात पडळकर यांच्या उमेदवारीला महत्त्व प्राप्त झाले असताना न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर परिणाम झाला आहे. या घडामोडींचा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर गोपीचंद पडळकर पुढे कोणती भूमिका घेतात, तसेच या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पुढील कायदेशीर पर्यायांचा अवलंब करतात का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत या प्रकरणाचे पुढील पडसाद काय उमटतात, हे आगामी घडामोडींनंतर स्पष्ट होईल.


