सातारा प्रतिनिधी
सातारा : ‘सहकारी बँका, पतसंस्था, साखर कारखाने आणि सूतगिरण्या ही सर्वसामान्यांच्या उन्नतीची साधने आहेत. मात्र, सहकारात राजकारण घुसले, तर सर्वसामान्यांच्या विकासाचा मूळ उद्देश बाजूला पडतो आणि संपूर्ण सहकार चळवळीची वाताहत होते,’ असा स्पष्ट इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. पदासाठी मी कधीही हपापलेलो नाही. खासदारकीचा राजीनामाही दिला होता. त्यापेक्षा जिल्हा बँकेचे पद मोठे नाही. या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करता येते, हाच माझा हेतू आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले मित्रमंडळाच्या वतीने साताऱ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी सहकार चळवळीचा मूळ उद्देश, सर्वसामान्यांच्या विकासातील तिचे महत्त्व आणि आपल्या घराण्याच्या परंपरेविषयी भावना व्यक्त केल्या.
‘उद्या मी असेन, नसेन; पण अखेरच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहणार,’ असे सांगताना उदयनराजे काही क्षण भावूक झाले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये क्षणभर गंभीर शांतता पसरली. मात्र, लगेचच ‘लगेच काळजी करू नका, मी अजून भरपूर जगणार आहे,’ असे म्हणत त्यांनी वातावरण पुन्हा खेळीमेळीचे केले. त्यांच्या या मिश्किल टिप्पणीने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
‘पदे येतात आणि जातात; जनसेवा हेच अंतिम ध्येय’
‘मी पदांचा विचार करत नाही. पदे येतात आणि जातात. माझ्यासाठी वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हीच खरी पुण्याई आहे. जिल्हा बँक असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र, आमच्या घराण्याच्या परंपरेला कधीही तडा जाऊ देणार नाही. कोणत्याही अडचणीच्या काळात जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही,’ असा विश्वासही उदयनराजे यांनी व्यक्त केला.
सहकार चळवळ ही केवळ आर्थिक व्यवहारांची व्यवस्था नसून शेतकरी, कष्टकरी, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम आहे, असे सांगत त्यांनी सहकार संस्थांच्या सामाजिक जबाबदारीवर भर दिला. सहकारी बँका, पतसंस्था, सूतगिरण्या आणि साखर कारखान्यांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. केवळ आजच्या पिढीपुरता मर्यादित न राहता पुढील पिढ्यांच्या प्रगतीसाठीही सहकाराचा उपयोग झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हा बँकेचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले आहे. या नेतृत्वाने सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवल्यामुळेच सहकार चळवळ तळागाळापर्यंत पोहोचली. त्यामुळे या चळवळीचा मूळ उद्देश जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. सहकाराच्या माध्यमातून लोकांचे जीवनमान उंचावले पाहिजे; राजकीय स्वार्थासाठी या संस्थांचा वापर होऊ नये, असा अप्रत्यक्ष संदेशही उदयनराजे यांनी दिला.
‘जिल्हा बँकेत येण्यामागे एकच हेतू; जास्तीत जास्त लोकांची सेवा’
जिल्हा बँकेतील आपल्या निवडीमागील भूमिका स्पष्ट करताना उदयनराजे म्हणाले, ‘माझ्यापेक्षा सहकाराचे अधिक ज्ञान असलेले अनेक जण आहेत. मात्र, जिल्हा बँकेत मी असावे, असा त्यांचा आग्रह होता. या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा करण्याची संधी मिळते, एवढाच माझा जिल्हा बँकेत येण्यामागचा हेतू आहे.’
त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा बँकेतील पदाकडे केवळ राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीने न पाहता, जनसेवेच्या माध्यमातून त्याचा उपयोग करण्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. सहकार क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढल्यास त्याचा फटका सामान्य सभासद, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला बसू शकतो, ही बाबही त्यांच्या भाषणातून ठळकपणे समोर आली.
या सत्कार समारंभाला माजी जिल्हा परिषद सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, संग्राम बर्गे, डी. के. पवार, रामभाऊ लाहोटी, संतोष कणसे, बाळासाहेब ननावरे, अशोक मोने, यशवंत ढाणे, उदयसिंह जगदाळे, धनाजी साळुंखे आदी उपस्थित होते.


