सातारा प्रतिनिधी
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीच्या सभापती सौ. तेजस्विनी विक्रमशील कदम यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील नियुक्तीपत्र जारी केले.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २८(२)(झ) अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यत्वाचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत निश्चित करण्यात आला असून, या कालावधीत सौ. कदम यांचे सिनेट सदस्यत्व सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सदस्यत्वाशी संलग्न राहणार आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटच्या बैठकांमध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये सौ. कदम यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी नियुक्तीपत्रातून व्यक्त केली आहे. या नियुक्तीमुळे सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधित्वाला विद्यापीठाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
सौ. तेजस्विनी कदम यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीबद्दल जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाकडूनही सौ. तेजस्विनी कदम यांचे अभिनंदन करण्यात आले.


