सातारा प्रतिनिधी
साताऱ्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरावरून झालेल्या कौटुंबिक वादातून एका शिक्षक वडिलांनी आपल्या १७ वर्षीय मुलीच्या डोक्यात क्रिकेटच्या बॅटने प्रहार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीचा मृत्यू झाला. आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७) असे मृत मुलीचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील पुरुषोत्तम संपत कदम यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा शहरातील गोडोली परिसरात खळबळ उडाली आहे.
मुलीच्या वर्तनामुळे पालक चिंतेत
मिळालेल्या माहितीनुसार, आर्याच्या वर्तनात गेल्या काही काळापासून बदल झाला होता. तिची संगत आणि काही सवयींबाबत तिचे आई-वडील चिंतेत होते. आर्याचे आई-वडील दोघेही शिक्षक असल्याचे समोर आले आहे. मुलीने चुकीच्या मार्गावर जाऊ नये, तिच्या सवयी सुधाराव्यात यासाठी पालकांनी तिला अनेकदा समजावून सांगितले होते. तिचे समुपदेशन आणि उपचारही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र, आर्या मोबाईलवर बराच वेळ व्यस्त राहत असल्याने तसेच टीव्ही पाहण्यावरून घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही तिचे वडिलांसोबत वाद झाले होते.
शनिवारी रात्री पुन्हा वाद पेटला
शनिवारी रात्री टीव्ही आणि मोबाईलच्या वापरावरून आर्या आणि तिच्या वडिलांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद वाढत गेला. या वेळी आर्याने वडिलांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
वादाच्या भरात आर्याने हातात क्रिकेटची बॅट घेतल्याचे सांगितले जाते. तिच्याकडून बॅट घेण्याचा प्रयत्न करताना पुरुषोत्तम कदम यांनी बॅट हिसकावून घेतली. त्यानंतर संतापाच्या भरात त्यांनी आर्याच्या पायावर आणि डोक्यावर बॅटने प्रहार केला.
डोक्यात बॅट लागली अन् आर्या जमिनीवर कोसळली
बॅटचा जोरदार प्रहार डोक्याला लागल्याने आर्या गंभीर जखमी झाली आणि रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळली. घटनेनंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच घरातील वातावरण बदलले. आर्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सकाळी आर्या बेशुद्ध असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, पोलिसांना या घटनेबाबत संशय आल्याने त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली.
पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक सत्य समोर
पोलिसांनी आर्याचे वडील पुरुषोत्तम कदम यांची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी रागाच्या भरात आर्याच्या डोक्यात बॅटने मारल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली.
दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी संबंधित वस्तू जप्त केल्या असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर आर्याच्या मृत्यूचे नेमके कारण आणि मारहाणीमुळे झालेल्या दुखापतींचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे.
एका क्षणाच्या रागाने कुटुंब उद्ध्वस्त
ज्या मुलीला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी पालक प्रयत्न करत होते, त्याच मुलीचा वडिलांच्या हातून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पालक-मुलांमधील संवाद, वाढता मोबाईल वापर, कौटुंबिक तणाव आणि संतापाच्या भरात घेतले जाणारे निर्णय किती भयंकर परिणाम घडवू शकतात, याची जाणीव या घटनेने पुन्हा करून दिली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सातारा शहर पोलीस करत असून, घटनेमागील सर्व परिस्थिती, मृत्यूची नेमकी कारणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास सुरू आहे.


