नवी दिल्ली वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच, कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) जंतरमंतरवरील प्रस्तावित आंदोलनापूर्वी झालेल्या धरपकडीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘तुम्हाला हवे तितके पोलीस बोलवा, नेत्यांना आणि तरुणांना अटक करा; मात्र आम्ही आता सर्व बाजूंनी तुमच्यावर चाल करून येत आहोत. आता माघार घेणार नाही,’ असा आक्रमक इशारा राहुल गांधी यांनी दिला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने यापूर्वी तीन दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच काही प्रमुख आंदोलक आणि राजकीय नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) निशाणा साधला. गेल्या दशकाहून अधिक काळापासून नरेंद्र मोदी, आरएसएस आणि त्यांच्या साथीदारांविरोधात आपण लढा देत असल्याचे सांगत, या विरोधकांच्या कार्यपद्धतीची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचा दावा त्यांनी केला. प्रतिस्पर्ध्याला समजून घेतल्याप्रमाणे आपणही आपल्या विरोधकांना ओळखले असून, त्यांच्या प्रत्येक चालीची आपल्याला जाणीव आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. विरोधकांवर टीका करताना त्यांनी भ्याडपणाचा आरोपही केला.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावरही गंभीर राजकीय आरोप केले. या संघर्षात संबंधित नेत्यांची भूमिका असल्याचा आरोप करत, आता त्यांची कोंडी होत असल्याचे त्यांनी म्हटले.
‘पोलीस बळाचा वापर करून आवाज दाबता येणार नाही’
आंदोलन दडपण्यासाठी कितीही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला, तरी विरोधकांचा लढा थांबणार नसल्याचे राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. दहा हजार, वीस हजार किंवा पन्नास हजार पोलीस बोलवा, सर्व नेत्यांना आणि तरुणांना अटक करा; आम्हाला सर्वांना अटक केली तरी आमची माघार असणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. सरकारने कितीही दडपशाही केली, तरी विरोधक सर्व बाजूंनी संघर्ष तीव्र करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनापूर्वी झालेल्या धरपकडीमुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाहीतील आंदोलनांचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्षाला आणखी धार आली असून, आगामी काळात या आंदोलनाचे राजकीय पडसाद देशभर उमटण्याची शक्यता आहे.


