नवी दिल्ली वृत्तसंस्था
काँकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते अभिजीत दीपके हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करण्यासाठी पोहोचले असतानाच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिजीत दीपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकर दीपके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या त्यांच्या मूळगावी ही दुःखद घटना घडली. एकीकडे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे घरातून आलेल्या या दुःखद बातमीमुळे दीपके कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
सावित्रीबाई दीपके या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वयोमानामुळे आणि दीर्घ आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. अभिजीत यांच्या आजीच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.
आई-वडील हिंगोलीला रवाना होणार?
अभिजीत दीपके यांचे वडील भगवान दीपके आणि आई अनिता दीपके हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या निवासस्थानाभोवती पोलिसांचा बंदोबस्त असल्याची माहिती आहे. आजीच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अभिजीत यांचे आई-वडील तातडीने हिंगोली जिल्ह्यातील मूळगावी रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदोलनासाठी दिल्लीत; विमानतळावरच पोलिसांची कारवाई
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कथित निवडणूक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजीनाम्याची मागणी करत अभिजीत दीपके यांनी १० ऑक्टोबर रोजी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. मात्र, दिल्लीत पोहोचल्यानंतर विमानतळावरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
या घडामोडींमुळे अभिजीत दीपके यांना आजीच्या निधनाची बातमी समजली आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. त्यांना ही बातमी कधी आणि कशा प्रकारे कळवली जाणार, तसेच अंत्यविधीसाठी त्यांना हिंगोलीला जाता येणार का, याबाबतही अनिश्चितता आहे.
आजीची शेवटची भेट होणार का?
अभिजीत दीपके गेल्या आठ दिवसांपासून आंदोलनाच्या संदर्भात मुंबईत होते. या काळात ते कुटुंबीयांच्या संपर्कात केवळ फोनद्वारे असल्याचे सांगितले जाते. छत्रपती संभाजीनगर येथे असताना त्यांनी आजीची भेट घेतली होती, अशी माहिती आहे. मात्र, त्यानंतर मुंबईत आल्यापासून आजीशी त्यांचा संपर्क झाला नसल्याचे समजते.
आंदोलनाच्या तयारीत असलेल्या अभिजीत दीपके यांच्यासाठी आजीच्या निधनाची बातमी हा मोठा कौटुंबिक आघात ठरला आहे. एका बाजूला पोलिसांची कारवाई आणि आंदोलनाचे आव्हान, तर दुसऱ्या बाजूला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला गमावल्याचे दुःख, अशा दुहेरी परिस्थितीत दीपके कुटुंब सापडले आहे. अभिजीत दीपके यांना अंत्यदर्शनासाठी गावी जाता येणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.


