मुंबई प्रतिनिधी
मुंबई : कुर्ला पूर्वेकडील नेहरू नगर परिसरातील मास मेट्रोपोलिस या बहुमजली इमारतीत गुरुवारी रात्री लिफ्टचा भीषण अपघात घडला. चौदाव्या मजल्यावरून खाली येणारी लिफ्ट अचानक सहाव्या मजल्याजवळ कोसळल्याने त्यामध्ये असलेले लहान मुलांसह १४ जण अडकले. अग्निशमन दल आणि नेहरू नगर पोलिसांनी सुमारे तीन तास राबवलेल्या बचावकार्यानंतर सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मास मेट्रोपोलिस इमारतीतील चौदाव्या मजल्यावर एका कुटुंबाचा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम संपल्यानंतर पाहुणे आणि नातेवाईक घरी जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढले. लिफ्ट खाली येत असताना सहाव्या मजल्याजवळ अचानक मोठा आवाज झाला. त्यानंतर लिफ्टला आधार देणाऱ्या केबल्स निखळल्याचे सांगण्यात येत आहे. लिफ्ट वेगाने खाली सरकली आणि तळमजल्याच्या काही फूट आधी जोरदार धक्का बसून अडकली.
लिफ्ट अचानक कोसळल्याने आत असलेल्या नागरिकांची मोठी घबराट उडाली. धक्क्यामुळे प्रवासी एकमेकांवर आदळले, तर लहान मुले भीतीने रडू लागली. लिफ्टमध्ये अंधार पसरल्याने आणि हवा खेळती राहण्याचा मार्ग बंद झाल्याने अडकलेल्या नागरिकांची चिंता वाढली. लिफ्टचा अलार्म वाजल्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी लोखंडी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र दरवाजे अडकल्याने त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. लिफ्टचा सांगाडा अडकल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या. जवानांनी हायड्रॉलिक जॅक आणि कटरच्या मदतीने लिफ्टचे दरवाजे व पत्रे कापण्यास सुरुवात केली. आत अडकलेल्या नागरिकांना धीर देत अत्यंत काळजीपूर्वक बचावकार्य करण्यात आले. अखेर तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सर्व १४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बाहेर आल्यानंतर अनेक नागरिक घाबरलेल्या अवस्थेत होते, तर लहान मुलेही या प्रसंगामुळे भयभीत झाली होती.
या घटनेनंतर नेहरू नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लिफ्टमध्ये प्रवास करणाऱ्या १४ जणांचे एकूण वजन लिफ्टच्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक होते का, याची पडताळणी केली जात आहे. लिफ्टची नियमित देखभाल केली जात होती का आणि केबल्स अचानक कशामुळे निखळल्या, याचाही तपास होणार आहे. याप्रकरणी बिल्डर आणि लिफ्टची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदाराची चौकशी केली जाणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


