मुंबई प्रतिनिधी
मुंबई : कर्तव्यनिष्ठा, धाडस आणि जनसेवेप्रती समर्पणभाव जपत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा मुंबईतील लोकभवन येथे गौरव करण्यात आला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते आयोजित पोलीस अलंकरण सोहळ्यात एकूण १०३ पोलीस अधिकारी व अंमलदारांना विविध श्रेणीतील पोलीस पदके प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या या पदकांमधून पोलीस दलातील शौर्य, कर्तव्यपरायणता आणि सेवाभावाचा गौरव करण्यात आला.

सन २०२२ आणि २०२३ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तसेच २०२३ आणि २०२४ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या पोलीस पदकांचे वितरण या सोहळ्यात करण्यात आले. शौर्यपूर्ण कामगिरीपासून ते दीर्घकालीन उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेपर्यंत विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात दोन अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक (PMG), १८ जणांना शौर्य पदक (GM), तीन अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (PPM), चार अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक (PSM), ४० अधिकारी व अंमलदारांना पोलीस पदक (PM), तर ३६ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) प्रदान करण्यात आले.
सन्मानित अधिकाऱ्यांमध्ये मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) प्रवीण कुमार पडवळ आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) निशिथ मिश्रा यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एटीएस) नवल बजाज यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पदकप्राप्त अधिकारी व अंमलदार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत आणि राज्यगीताने सोहळ्याची सुरुवात झाली. राष्ट्रसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीताने झाली. पोलीस दलातील शौर्य, निष्ठा आणि सेवाभावाचा सन्मान करणारा हा सोहळा ठरला.


