पुणे प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तरुण-तरुणींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जेजुरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता. अखेर मंगळवारी दुपारी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने खेडेकर याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत खेडेकर याने अनेक तरुण-तरुणींकडून मोठ्या रकमा घेतल्याचा आरोप आहे. नोकरीच्या आशेने पैसे दिल्यानंतर संबंधितांना महापालिकेची बनावट नियुक्तीपत्रे देण्यात आली. एवढेच नव्हे, तर महापालिकेचे बनावट शिक्के, बनावट पत्रे आणि अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या वापरण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
बनावट नियुक्तीपत्रांसह वेतनाचीही ‘सेटिंग’
फसवणुकीचा प्रकार अधिक विश्वासार्ह वाटावा यासाठी काही तरुण-तरुणींची काही महिन्यांची वेतन प्रक्रिया देखील करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळे संबंधितांना आपली महापालिकेत नोकरी लागल्याचा विश्वास बसला. मात्र, या संपूर्ण प्रकारामागे बनावट कागदपत्रांच्या आधारे रचलेले फसवणुकीचे जाळे असल्याचे उघड झाले.
तीन गुन्हे दाखल; दोन महिन्यांपासून पोलिसांचा शोध
खेडेकर याच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसंदर्भात तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. प्रकरण समोर आल्यानंतर तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू ठेवला होता.
अखेर पोलिसांना खेडेकरच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी दुपारी त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
टोळीत आणखी कोण? पोलिसांचा तपास सुरू
या फसवणुकीच्या प्रकरणात खेडेकर एकटाच सहभागी होता की त्याच्यासोबत आणखी काही जणांचे जाळे कार्यरत होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बनावट नियुक्तीपत्रे, शिक्के, अधिकाऱ्यांच्या सह्या तसेच पैशांच्या व्यवहारांचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा सहभाग आणि फसवणूक झालेल्या व्यक्तींची संख्या तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


