मुंबई प्रतिनिधी
मुंबई : अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी तसेच बडतर्फ माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मार्च २०२१ पासून कारागृहात असलेल्या वाझेला दीर्घकाळ झालेल्या कारावासाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने जामीन दिला.
वाझेला १ लाख रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर आणि त्याच रकमेच्या स्थानिक जामीनदारावर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, जामिनासोबत न्यायालयाने त्याच्यावर काही कठोर अटीही घातल्या आहेत. पासपोर्ट असल्यास तो एनआयएकडे जमा करावा लागणार आहे. तसेच महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाईपर्यंत मुंबईसह पाच जिल्ह्यांमध्ये प्रवेशावर निर्बंध राहणार आहेत.
मुंबईसह पाच जिल्ह्यांत प्रवेशबंदी
न्यायालयाच्या अटींनुसार वाझेला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांत राहता येणार नाही. केवळ न्यायालयीन कामकाजासाठी या जिल्ह्यांत येण्याची परवानगी असेल. त्याने राहत्या ठिकाणाचा पत्ता सात दिवसांच्या आत एनआयएला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच दर रविवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. साक्षीदारांशी संपर्क साधू नये आणि पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
२४ तास फोन सुरू ठेवण्याची अट
वाझेला २४ तास पूर्णपणे चार्ज असलेला मोबाईल फोन जवळ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एनआयएला आवश्यकतेनुसार त्याच्याशी संपर्क साधता येईल तसेच व्हिडीओ कॉलद्वारे त्याची खात्री करता येईल, अशी अटही जामिनात ठेवण्यात आली आहे.
खटल्याला ऑगस्टमध्ये सुरुवात
अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने ऑगस्ट २०२६ मध्ये सचिन वाझेसह अन्य आरोपींविरोधात आरोप निश्चित केले होते. त्यांच्यावर कटकारस्थान, हत्या आणि संबंधित गुन्ह्यांबाबत खटला चालणार आहे.
या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा, सुनील माने आणि रियाजुद्दीन काझी यांच्यासह इतर आरोपींचीही नावे आहेत. यापैकी काही आरोपींना यापूर्वीच विविध न्यायालयांकडून जामीन मिळाला आहे.
दरम्यान, वाझेला या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्याच्याविरोधात इतर प्रकरणे प्रलंबित असल्याने त्याची तात्काळ कारागृहातून सुटका होईलच, असे नाही. त्यामुळे जामीन मंजूर झाल्यानंतरही त्याच्या पुढील कायदेशीर स्थितीकडे लक्ष लागले आहे.


