मुंबई प्रतिनिधी
मुंबई : रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत कॅगच्या अहवालातून गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही पाणी गुणवत्तेची व्यापक तपासणी मोहीम राबवली. पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागाने ९ ते १५ सप्टेंबर २०२६ या सात दिवसांत विविध रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची तपासणी केली. या मोहिमेत २७६ जिवाणूशास्त्रीय नमुने आणि तब्बल १,७४५ रेसीडुअल क्लोरीन चाचण्या करण्यात आल्या.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तपासणी करण्यात आलेल्या २७६ जिवाणूशास्त्रीय नमुन्यांपैकी ९९ टक्क्यांहून अधिक नमुने योग्य आढळले. त्याचबरोबर घेण्यात आलेल्या १,७४५ रेसीडुअल क्लोरीन चाचण्यांपैकी ९६ टक्क्यांहून अधिक चाचण्यांचे निकाल समाधानकारक असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.
कॅगच्या अहवालानंतर रेल्वे प्रशासन सतर्क
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली होती. काही रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई-कोलायसारखे घातक जिवाणू आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा येथील काही नमुन्यांमध्ये त्रुटी आढळल्याचेही समोर आले होते. वॉटर कूलर्सची नियमित स्वच्छता न होणे, पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचणे यांसारख्या बाबींवरही अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
मध्य रेल्वेकडूनही उपाययोजना
कॅगच्या निरीक्षणानंतर प्रवाशांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेने २० हजार ठिकाणी टँक-टू-टॅप गाळण प्रणाली बसवण्याचे नियोजन केले आहे. वॉटर कूलर्सच्या पाण्याच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणारी यंत्रणा बसवणे तसेच जुन्या आणि जीर्ण पाण्याच्या साठवण टाक्या टप्प्याटप्प्याने बदलण्याची कार्यवाहीही प्रस्तावित आहे.
अयोग्य नमुन्यांवर तातडीने उपाय
पश्चिम रेल्वेच्या तपासणीत जे नमुने योग्य आढळले नाहीत, त्यांची माहिती संबंधित विभागांना देण्यात आली आहे. पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले.
रेल्वे स्थानकांवरील पिण्याचे पाणी, वॉटर कूलर्स, पाण्याच्या टाक्या आणि पाइपलाइन यांची स्वच्छता व देखभाल यावर नियमित लक्ष ठेवले जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सुरक्षित पिण्याचे पाणी, योग्य क्लोरीनीकरण आणि स्वच्छता सुनिश्चित करणे हा या तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
नियमित तपासणीवर भर
पश्चिम रेल्वेकडून ही तपासणी केवळ एकदाच न करता नियमितपणे जिवाणूशास्त्रीय आणि रेसीडुअल क्लोरीन चाचण्यांच्या माध्यमातून केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना उपलब्ध होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर सातत्याने देखरेख ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


