संभाजीनगर प्रतिनिधी
दारू पिऊन कामावर आल्याने नोकरी गमवावी लागली आणि त्याचाच राग मनात धरून संतप्त कामगाराने थेट कंपनीलाच आग लावल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरात घडली आहे. वडगाव कोल्हाटी शिवारातील युरोटेक इंजिनिअरिंग कंपनीत घडलेल्या या प्रकारात तब्बल ९० हजार रुपये किमतीचा कुलिंग टॉवर जळून खाक झाला. विशेष म्हणजे, आरोपीने आग लावतानाचे संपूर्ण कृत्य शेजारील कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संबंधित कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सागर चंद्रकांत पुरी (३२, रा. गजानननगर, गारखेडा) यांची वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटी शिवारात गट क्रमांक ६१ मध्ये युरोटेक इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीत शेरखान पठाण (५०, रा. आझाद चौक, जिन्सी) कामाला होता. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेरखान दारू पिऊन कामावर आला. त्यामुळे कंपनी मालक सागर पुरी यांनी त्याला कामावरून काढून टाकले.
मात्र, नोकरी गेल्याचा राग शेरखानच्या मनात कायम होता. त्यातूनच त्याने त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता पुरी यांना फोन करून कंपनीतील साहित्याला आग लावून नुकसान करण्याची धमकी दिली. पुरी यांनी त्याला याबाबत विचारणा केली; मात्र त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही.
दुसऱ्याच दिवशी कंपनीत जळीतकांड!
८ नोव्हेंबर रोजी सकाळी कंपनीतील कामगार रमेश वाघमारे आणि शाकीर शेख यांनी सागर पुरी यांना फोन केला. कंपनीचे शटर उचकटलेल्या अवस्थेत असून आतील साहित्य जळाल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळताच पुरी यांनी मित्र अक्षय ताठे यांच्यासह कंपनीत धाव घेतली. पाहणी केली असता ९० हजार रुपये किमतीचा ए.आर.पी. कुलिंग टॉवर आगीत जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.
सीसीटीव्हीने आरोपीचा पर्दाफाश!
घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुरी यांनी कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गजानन अॅग्रो कंपनीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी ७ नोव्हेंबरच्या रात्री सुमारे ११ वाजता शेरखान पठाण कुलिंग टॉवरला आग लावत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे नोकरीवरून काढल्याच्या रागातूनच त्याने कंपनीचे नुकसान केल्याचा संशय बळावला.
या फुटेजच्या आधारे सागर पुरी यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शेरखान पठाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे या जळीतकांडातील आरोपीची ओळख पटण्यास मदत झाली. नोकरी गेल्याच्या रागातून थेट कंपनीचे नुकसान करण्यापर्यंत मजल गेल्याने औद्योगिक वसाहतीत या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.


