ठाणे प्रतिनिधी
नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने यंदा तब्बल १७० कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे अपेक्षित आहे. तसेच मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठीही शक्यतो कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
नागरिकांना घराजवळच विसर्जनाची सुविधा उपलब्ध व्हावी आणि पारंपरिक विसर्जनस्थळांवरील गर्दी कमी व्हावी, यासाठी यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली आहे. नवी मुंबईतील पारंपरिक विसर्जनस्थळांवर गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे गर्दीचे विभाजन करण्यासोबतच समुद्र, खाडी आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महापालिकेच्या परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागाने कृत्रिम तलावांची ठिकाणे निश्चित केली असून, तलाव उभारणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. नागरिकांनी शक्यतो घराजवळील कृत्रिम तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. शक्य असल्यास घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन करण्यासही प्राधान्य द्यावे, असे महापालिकेने सांगितले आहे.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. सजावटीसाठी प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून कापड, कागद आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. कर्णकर्कश ध्वनी टाळून मर्यादित आवाजात वाद्यांचा वापर करावा तसेच लेझर दिव्यांचा वापर टाळावा, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून मंडप परवानगीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक खिडकी पद्धतीची ऑनलाइन ई-सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विसर्जनस्थळांवर भाविकांच्या सुविधेसाठी स्वयंसेवक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
निर्माल्य संकलन व वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून तराफे, फोर्कलिफ्ट यांसह आवश्यक यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात येणार आहे. गणेशमूर्ती व निर्माल्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
नवी मुंबईतील विभागनिहाय कृत्रिम तलावांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : बेलापूर २२, नेरुळ २९, वाशी १६, तुर्भे २१, कोपरखैरणे १६, घणसोली १६, ऐरोली २५ आणि दिघा २५. अशा प्रकारे शहरात एकूण १७० कृत्रिम विसर्जन तलाव उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

