मुंबई प्रतिनिधी
मुंबई : खार रोड रेल्वे स्थानक परिसरात भरधाव कारने १९ वर्षीय तरुणीसह पोलीस हवालदार आणि अन्य व्यक्तींना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, काही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी कार चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश यादव (३६) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव असून, मेहुल प्रवीणचंद्र जोशी (५०) हे कारचे मालक आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कारने सर्वप्रथम १९ वर्षीय तरुणीला धडक दिली. त्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलीस हवालदाराने कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार पुढे जाताना हवालदारासह आणखी दोन ते तीन जणांना धडकली. त्यानंतर कारने तेथे उभ्या असलेल्या दोन ते तीन रिक्षांनाही धडक दिली आणि ती थांबली.
या घटनेप्रकरणी चालक दिनेश यादव आणि कार मालक मेहुल प्रवीणचंद्र जोशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिनेश यादव याला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, कार मालक मेहुल प्रवीणचंद्र जोशी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलिसांकडून देण्यात आली आहे.

