मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी जमवून ठेवलेली १० लाख रुपयांची रोकड घरातील गुप्त कप्प्यात सुरक्षित असल्याचा विश्वास एका कुटुंबाला होता. मात्र, घरात काम करणाऱ्या मोलकरणीला या कप्प्याची माहिती मिळाली आणि तिने संधी साधत संपूर्ण रोकडच लंपास केली. चोरी केल्यानंतरही ती नेहमीप्रमाणे घरात काम करत राहिल्याने कुटुंबीयांना संशय आला. वांद्रे पोलिसांनी तपास करत ३१ वर्षीय तनुजा मंडल हिला अटक केली असून, तिच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
वांद्रे पश्चिम परिसरातील या प्रकरणात तक्रारदार हे ४९ वर्षीय कॉर्पोरेट वकील असून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही वकिली केली आहे. त्यांच्या वृद्ध आई-वडिलांच्या घरात तनुजा सुमारे वर्षभरापासून केअरटेकर आणि घरकाम करणारी महिला म्हणून कार्यरत होती. घराची साफसफाई करत असताना तिला बेडरुमच्या छतामध्ये तयार करण्यात आलेल्या गुप्त कप्प्याची माहिती मिळाली होती.
मुलीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशासाठी आवश्यक असलेली रक्कम उभी करण्यासाठी वकिलाने कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले होते. ९ सप्टेंबर रोजी त्यांनी ही रक्कम पालकांच्या घरातील गुप्त कप्प्यात ठेवली. त्यानंतर मुलीचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी बँकेत रक्कम जमा करण्यासाठी पैसे घेण्यासाठी गेली. मात्र, कप्पा उघडल्यानंतर त्यात रोकड नसल्याचे समोर आले.
घरात त्या काळात इतर कोणीही आले नसल्याचे तपासात लक्षात आले. त्यामुळे वकिल दाम्पत्याचा संशय घरात नियमितपणे येणाऱ्या तनुजाकडे गेला. पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रवेशद्वारावरील पाहुण्यांच्या नोंदी तपासल्या. त्यानंतर तनुजाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत तनुजाने रोकड चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीसाठी दुचाकी खरेदी करण्याच्या उद्देशाने तिने ही चोरी केल्याचे तपासात समोर आले. विशेष म्हणजे, चोरी केल्यानंतरही तिने नेहमीप्रमाणे त्या घरात काम सुरू ठेवले होते.
तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी कारवाई करत तनुजाकडून चोरीला गेलेली संपूर्ण १० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. या कारवाईत पश्चिम विभाग-२चे पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक अजय लिंगनुरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक यश पाळवे आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
या घटनेत तनुजाने वृद्ध दाम्पत्याला कोणतीही इजा केली नसल्याचे तसेच घरातील सोन्याच्या दागिन्यांना हात लावला नसल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मुलीच्या शिक्षणासाठी जमवलेली रक्कम परत मिळाल्याने कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वांद्रे पोलीस करीत आहेत.

