स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मालवणी पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत नालासोपारा पश्चिम येथून २६३ ग्रॅम हेरॉईन (गर्द पावडर) जप्त केली. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ७८ लाख ९० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, हेरॉईनचा पुरवठा करणाऱ्या आणखी एका संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत.
मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांती वेलफेअर सोसायटी, लक्ष्मीनगर, अली तलाव रोड, खारोडी परिसरात १४ ऑगस्ट रोजी रात्री सुमारास पोलिसांनी कारवाई केली. यावेळी ३४ वर्षीय इसमाकडून विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले ४.९० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे एक लाख ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३६१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपीने सदर हेरॉईन नालासोपारा येथून आणल्याची माहिती दिली. तसेच पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तपासाची दिशा नालासोपाऱ्याकडे वळवण्यात आली. त्यानंतर गोल्डन अपार्टमेंट, वाघेश्वरी, नालासोपारा पश्चिम येथे पोलिसांनी कारवाई करून १४ सप्टेंबर ला १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल २६३ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ७८ लाख ९० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले.
चौकशीत या तरुणाने सदर अमली पदार्थ उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील सिगरोड गावातील एका व्यक्तीकडून आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य पुरवठादाराचा शोध सुरू असून, गुन्ह्याचा पुढील तपास मालवणी पोलीस करत आहेत.
ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त, उत्तर परिमंडळ-२ संदिप घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मालवणी विभाग महेशकुमार ठाकुर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राणी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मिना मरे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लोंढे, पोलीस हवालदार रब्बिल शेख, पोलीस शिपाई साजिद शेख, मुद्दस्सर देसाई, कालिदास खुडे, दत्तात्रय गावडे, सुमित सोरटे आणि तांत्रिक मदतीसाठी पोलीस शिपाई आदित्य राणे सहभागी झाले होते.

