नवी दिल्ली प्रतिनिधी
ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना तमिळ भाषेतील प्राचीन ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’ची रशियन भाषेतील आवृत्ती भेट दिली. भारत आणि रशियामधील ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा संदेश या भेटीतून देण्यात आला.
कवी-संत तिरुवल्लुवर यांनी रचलेला ‘तिरुक्कुरळ’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा महत्त्वपूर्ण तमिळ ग्रंथ असून त्यात १,३३० कुरळ अर्थात द्विपदी आहेत. मानवी जीवनातील नीतिमत्ता, सदाचार, शासन, अर्थकारण, मैत्री, प्रेम आणि मानवी भावभावना यांचा त्यात सखोल विचार करण्यात आला आहे.
ग्रंथाचे ‘अरम’, ‘पोरुल’ आणि ‘इन्बम’ असे तीन प्रमुख विभाग आहेत. ‘अरम’मध्ये सदाचार, सत्य, करुणा आणि नैतिक मूल्ये; ‘पोरुल’मध्ये शासन, प्रशासन, अर्थकारण आणि सामाजिक जीवन; तर ‘इन्बम’मध्ये प्रेम, भावना आणि नातेसंबंधांचा वेध घेण्यात आला आहे.
तमिळ संस्कृतीवर खोलवर प्रभाव टाकणारा हा ग्रंथ केवळ साहित्यिक ठेवा नसून सार्वत्रिक मानवी मूल्यांचा संदेश देणारा भारतीय ज्ञानपरंपरेचा अमूल्य वारसा मानला जातो. पुतिन यांना त्याची रशियन आवृत्ती भेट देऊन मोदी यांनी भारत-रशिया संबंधांना राजकारणासोबतच साहित्य आणि संस्कृतीचीही भक्कम जोड असल्याचे अधोरेखित केले.

