स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : आयकर विभाग आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून बनावट छापा टाकत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आयकर विभागातील आयकर निरीक्षक आणि कर सहायकासह दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार कंडासमी (४९) यांच्याकडे संतोष उदय खोपटकर हा पूर्वी चालक म्हणून काम करत होता. कंडासमी आणि खोपटकर यांच्यात वाद झाल्यानंतर कंडासमी यांनी त्याला सहा महिन्यांचा पगार न देता नोकरीवरून काढून टाकले होते. याचा राग मनात धरून खोपटकर याने कंडासमी यांच्याबाबतची माहिती वापरून आपल्या साथीदारांसोबत कट रचल्याचे पोलिस तपासात समोर आले.
त्यानुसार आरोपींनी आपण आयकर विभाग आणि क्राईम ब्रँचचे अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवले. बनावट शासकीय ओळखपत्र दाखवून त्यांनी कंडासमी यांच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर कंडासमी आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. तसेच कार्यालयातील अन्य दहा कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन काढून घेत त्यांना कार्यालयाबाहेर जाण्यास मज्जाव केला.
आयकर विभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत आरोपींनी कंडासमी आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. कारवाई टाळायची असल्यास एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकारानंतर कंडासमी यांनी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून अंधेरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संतोष उदय खोपटकर (३७), विनय रमेश मोरे (३७), प्रेम किसन सबनानी (५०), प्रज्ञा हरीश माईन (२७), रेश्मा शामराव वारंग (४१) आणि सबिना हाफीज शेख (४८) यांना अटक केली.
या आरोपींची चौकशी करताना प्रकरणात आयकर विभागातील अधिकारी सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आयकर निरीक्षक सुरेश महावीरप्रसाद मिश्रा (५७), कर सहायक सुनिल मनोहर गोरे (५९), जितु उर्फ जितेंद्र नामदेव मोरे (५२) आणि अशोक विठोबा शिंदे (५७) यांचा सहभाग समोर आला. पोलिसांनी या चौघांनाही १० सप्टेंबर रोजी अटक केली.
या आरोपींनी इतर साथीदारांसह फिर्यादीच्या कार्यालयात जाऊन बनावट कारवाईच्या कटात सहभाग घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास अंधेरी पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त देवेन भारती, सहपोलिस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख, पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलिस आयुक्त योगेश शिंदे तसेच अंधेरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मचिंदर आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) अतुल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली.

