स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांना अधिक कमाईचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या रॅकेटचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी एका २६ वर्षीय महिला दलालेला अटक केली असून, कारवाईदरम्यान एका महिलेची सुटका करण्यात आली. हॉटेलच्या खोलीतून कंडोमचे बॉक्स, रोकड तसेच दोन महागडे आयफोन जप्त करण्यात आले आहेत.
अपूर्वा भुजंग राव (वय २६, रा. ओशिवरा) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. खार पश्चिम परिसरातील एस.व्ही. रोडवरील राम कृष्ण नगर येथील रामी गेस्टलाइन हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती खार पोलिसांना मिळाली होती. मॉडेलिंग क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या तरुणींना सहज पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना हॉटेलमध्ये ग्राहकांकडे पाठविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे खार पोलिसांनी सापळा रचून सोमवारी (७ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास रामी गेस्टलाइन हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेची सुटका केली. तसेच संबंधित खोलीची झडती घेतल्यानंतर कंडोमचे बॉक्स, रोकड आणि दोन आयफोन जप्त केले.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अपूर्वा भुजंग राव हिच्याविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA) कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून तिच्या मोबाईल फोनची तसेच व्हॉट्सॲपवरील संभाषणांची तपासणी सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे, तसेच मुंबईतील मॉडेलिंग आणि ग्लॅमर क्षेत्राशी या नेटवर्कचे संबंध आहेत का, याचा तपास खार पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणातील अन्य दलाल आणि ग्राहकांची माहितीही पोलिसांकडून घेतली जात आहे.

