मुंबई प्रतिनिधी
नालासोपाऱ्यातील अवघ्या ११२ ग्रॅम एमडीच्या कारवाईपासून सुरू झालेला तपास थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एमडी निर्मितीच्या कारखान्यापर्यंत पोहोचला आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ने आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रॉन) तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. या कारवाईत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल ६९ किलो ७५९ ग्रॅम एमडी, १८ लाख ७० हजार रुपयांची रोकड, २६० लिटर घातक रसायने आणि मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळेतील साहित्य असा सुमारे १३९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रातील जळगाव, मुंबई, ठाणे आणि रायगडपासून गुजरातमार्गे उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचले आहेत. या तस्करीला आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
नालासोपाऱ्यातील ११२ ग्रॅम एमडीने उघडले रहस्य
२४ जून २०२६ रोजी रात्री गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर ते मनवेल पाडा रोड परिसरात पोलिसांनी सापळा रचला. बाबा पार्किंग परिसरातून अविनाश ऊर्फ सोनू लोकनाथ अय्यर (२२) आणि रविकांत ओमप्रकाश राम (२३) यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून ११२ ग्रॅम एमडी, अंदाजे तीन लाख ३६ हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४कडे सोपवण्यात आला. आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर या कारवाईमागे मोठे आंतरराज्यीय नेटवर्क असल्याचे उघड झाले.
गुजरातमधील शेतात उभारली होती ड्रग्ज फॅक्टरी
तांत्रिक तपास आणि आरोपींच्या चौकशीतून गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एमडी निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अबडासा तालुक्यातील सांधाण गावातील शेतजमिनीवर ही अवैध फॅक्टरी उभारण्यात आली होती. जुम्मा तालाब ठाकरा याच्या मालकीच्या जागेवर सुरू असलेल्या या कारख्यावर पोलिसांनी कारवाई करून जुम्मा ठाकरा याला अटक केली.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न फसला
तपासात ‘जालिम गँग’शी संबंधित आर्यन हरुण सय्यद ऊर्फ जालिम याने एमडी निर्मितीसाठी लागणारे रसायने आणि प्रयोगशाळेतील साहित्य रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे लपवून ठेवल्याचे समोर आले.
दरम्यान, पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर जाहीद शेख ऊर्फ जावेद भाई याने हा मुद्देमाल विरार-जेएनपीटी महामार्गावरील रायते, कल्याण परिसरात फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हा डाव उधळून लावला आणि साहित्य जप्त केले.
मुंबईतील आरोपीकडून ११ किलो ८०४ ग्रॅम एमडी
तपास पुढे नेत गुन्हे शाखेने मुंबईतील कापडिया नगर, कुर्ला परिसरातून मोहमद हसीब सिध्दीकी ऊर्फ इजाज मर्चेंट याला अटक केली. त्याच्याकडून ११ किलो ८०४ ग्रॅम एमडी आणि १८ लाख ७० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
हसीब सिध्दीकीच्या चौकशीतून एमडीचा मोठा साठा जळगावकडे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
जळगावमध्ये दोन वितरकांना अटक
यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावमध्ये कारवाई केली. मेहरुण येथील रहिम ताहेर पिंजारी (२८) आणि उस्मानिया पार्क येथील सय्यद मुशाइद अली मुमताज अली (३९) यांना अटक करण्यात आली.
दोघांकडून ४ किलो ९११ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. जळगावमध्ये ड्रग्ज वितरणाचे मोठे जाळे कार्यरत असल्याचे या कारवाईतून उघड झाले आहे.
प्रयागराजमध्ये सापडला एमडी निर्मितीचा मुख्य कारखाना
जळगाव आणि मुंबईतील आरोपींच्या चौकशीतून एमडीचा पुरवठा उत्तर प्रदेशातील रजनिश रामचंद्र मिश्रा आणि शिवधन शंभुनाथ मिश्रा यांच्याकडून होत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील भदोई येथे कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांनी प्रयागराज जिल्ह्यातील कोसाडा काला, मांडा परिसरातील शेतजमीन भाड्याने घेतल्याचे उघड झाले. या शेतजमिनीवर पत्र्याचे शेड उभारून एमडी निर्मितीचा कारखाना सुरू करण्यात आला होता.
पोलिसांनी या कारख्यावर छापा टाकत ५२ किलो ९३२ ग्रॅम तयार एमडी जप्त केले. त्याचबरोबर एमडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी २६० लिटर घातक रसायने आणि मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळेतील साहित्य हस्तगत करण्यात आले. कारखाना सील करण्यात आला आहे.
सात राज्यांपर्यंत तपासाचे धागेदोरे?
नालासोपारा, मुंबई, ठाणे, रायगड, गुजरात, जळगाव आणि उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे. या नेटवर्कमागे आणखी कोण व्यक्ती आहेत, एमडीचा पैसा आणि पुरवठा कोणत्या मार्गाने होत होता, तसेच या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का, याचा तपास सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त गोंडुराम बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले, प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्यासह अधिकारी आणि अंमलदारांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. सायबर सेलच्या पथकानेही तपासात मदत केली.
११२ ग्रॅमपासून ६९ किलो ७५९ ग्रॅमपर्यंत तपास
नालासोपाऱ्यातील ११२ ग्रॅम एमडीच्या कारवाईपासून सुरू झालेला तपास महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून गुजरात आणि उत्तर प्रदेशापर्यंत पोहोचला. प्रयागराजमध्ये एमडी निर्मितीचा कारखाना शोधून काढत पोलिसांनी तो उद्ध्वस्त केला. १३९ कोटींच्या मुद्देमालाची जप्ती आणि २१ आरोपींच्या अटकेमुळे अंमली पदार्थ तस्करीविरोधातील ही मोठी कारवाई मानली जात आहे.

