नवी दिल्ली वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७.८ टक्के विकास दर गाठल्याबद्दल देशाचे अभिनंदन करणारा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाा आहे. आपल्या नव्या रिलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी युद्धाच्या काळातही देशाने गाठलेल्या विकास दराबाबत जनतेचे अभिनंदन केले आहे.
त्याच वेळेस पीएम मोदी यांनी सोनं खरेदी आणि परदेश प्रवासाबाबतही भाष्य केले आहे. त्याशिवाय, त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
सोन्याबाबत काय म्हणाले?
7.8% growth.
Strong numbers.
Even stronger confidence. pic.twitter.com/ZVPpnAXrVU
— Narendra Modi (@narendramodi) September 1, 2026
पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना परदेश प्रवास टाळण्याचे आणि अत्यावश्यक असल्याशिवाय सोने खरेदी न करण्याचे आवाहनही केले. विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधान म्हणाले की, काही जण निराश झाले असून खोट्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करत आहेत.
पीएम मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशवासियांचे मनःपूर्वक अभिनंदन. ७.८ टक्के विकास दर. देश आनंदाने भरून गेला आहे. मी देशवासियांचे त्यांच्या दृढनिश्चयाबद्दल आणि प्रयत्नांबद्दल अभिनंदन करतो. जग युद्धात बुडाले आहे. सर्व बाजूंनी युद्धाच्या बातम्या येत आहेत. जग संकटांनी घेरले आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. २०२० च्या कोविड काळापासून स्थिरतेचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. असे असूनही, भारत वेगाने प्रगती करत आहे.”
पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला बोल
पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, “एकीकडे, भारतातील काही लोक निराशेच्या गर्तेत अडकून खोट्या गोष्टी पसरवत आहेत. आपण या सर्व आव्हानांवर मात करून ७.८ टक्के विकास दर गाठला आहे. आपल्याला ही गती कायम राखली पाहिजे. आपल्याला विकासही करायचा आहे. यासाठी आत्मनिर्भर भारत बनणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
सोने खरेदी करण्याबाबत पंतप्रधान काय म्हणाले?
पीएम मोदी यांनी म्हटले की, “स्वदेशीचा, स्थानिकांना प्रोत्साहन देण्याचा मंत्र म्हणजे परदेश प्रवास टाळणे. जर तुमचे लग्न परदेशात होणार असेल, तर ते करू नये. गरज असल्याशिवाय सोने खरेदी करणेही टाळावे. आपण स्वदेशीवर जितका जास्त भर देऊ, तितकाच आपण आत्मनिर्भरतेवर भर देऊ. माझा ठाम विश्वास आहे की, जेव्हा आपण स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करू, तेव्हा आपण आपल्या तरुण पिढीकडे एक विकसित भारत सोपवू. म्हणून, देशवासियांनो, आपण आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडू नये. आपली धोरणे योग्य आहेत आणि आपले हेतू स्पष्ट आहेत. १.४ अब्ज नागरिकांची शक्ती देशाला नव्या उंचीवर नेत आहे. आपण एक संकल्प करूया आणि हा संकल्प पूर्ण करण्यासाठी देशाला नव्या उंचीवर नेऊया, असे आवाहन त्यांनी केले.

