बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पारधी समाजातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पोलीस दलात प्रवेश मिळवून अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या ३१ वर्षीय पोलीस महिलेने कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात घडली. पतीकडून सावळ्या रंगावरून टोमणे, चारित्र्यावर संशय, वारंवार वाद आणि मारहाण होत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी पती किरण भानुदास भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
संगीता राजेंद्र काळे ऊर्फ संगीता किरण भोसले असे मृत महिलेचे नाव आहे. संगीताचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे, तर सासर सुपे येथे आहे. विवाहानंतर त्या पती किरण भोसले यांच्यासोबत डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात राहत होत्या.
सावळ्या रंगावरून टोमणे; चारित्र्यावर संशय
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संगीताचा सावळा रंग पतीला पसंत नव्हता. ‘तू काळी आहेस, मला आवडत नाहीस’, अशा स्वरूपाचे बोलणे करून तिचा मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या वादातून तिला मारहाणही केली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घरातील वस्तूंच्या खरेदीवरूनही पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचे सांगण्यात आले. वस्तू खरेदी करताना जास्त पैसे खर्च केल्याचा आरोप करून पतीकडून संगीताला त्रास दिला जात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.
सततच्या मानसिक त्रासातून टोकाचे पाऊल
कौटुंबिक वाद आणि मानसिक त्रासाला कंटाळून संगीताने बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांकडे दाखल तक्रारीत म्हटले आहे. तिच्या मृत्यूस पतीने प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
करंजे येथील सुलोचना राजेंद्र काळे यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती किरण भोसले याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सासरच्या मंडळींवरही छळाचे आरोप
दरम्यान, संगीताच्या सासरच्या मंडळींकडून आर्थिक मागणीसह सातत्याने छळ केला जात असल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पतीसोबतच इतर सासरच्या मंडळींविरोधातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली.
या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांनी संगीताचे पार्थिव वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या परिसरात आणले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते आणि फौजदार राहुल साबळे यांनी नातेवाइकांची समजूत काढली. डोंबिवली पोलिसांकडून पुरवणी जबाब घेण्यात येईल आणि इतर व्यक्तींची या प्रकरणातील भूमिका तपासली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर नातेवाइकांनी अंत्यसंस्कारास सहमती दर्शविली.
त्यानंतर सोमेश्वर मंदिराजवळील शेतात संगीतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पारधी समाजातील मुलींसाठी होती प्रेरणास्थान
संगीताचा प्रवास मात्र संघर्ष आणि जिद्दीचा होता. वडिलांचे पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रतिकूल परिस्थितीत मेहनत घेतली आणि अखेर पोलीस दलात स्थान मिळविले. तिच्या या यशामुळे पारधी समाजातील अनेक मुला-मुलींमध्ये शिक्षण घेऊन सरकारी सेवेत जाण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.
परिसरातील अनेक मुलींनी संगीताला आदर्श मानत पोलीस दलात प्रवेश करण्याचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे, तिचा पती किरण भोसले यालाही पोलीस भरतीसाठी संगीताने मार्गदर्शन केले होते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली.
संघर्षातून स्वतःचे आयुष्य घडवत समाजातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या संगीताचा कौटुंबिक छळाच्या आरोपांनंतर झालेला मृत्यू करंजे, सुपे आणि परिसरातील नागरिकांसाठी मोठा धक्का ठरला आहे. या प्रकरणातील पतीविरोधातील आरोप, तसेच इतर सासरच्या मंडळींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.

