बारामती प्रतिनिधी
दहीहंडीच्या उत्साहात पुण्याकडे निघालेल्या काही गोविंदांना बारामतीतच पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. उत्सवाच्या नावाखाली वाहनांमधून हुल्लडबाजी, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांविरोधात माळेगाव पोलिसांनी धडक मोहीम राबवली. या कारवाईत ३४ वाहनांवर कारवाई करून तब्बल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गंभीर स्वरूपाचा नियमभंग करणाऱ्या दोन वाहनचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथके विविध ठिकाणी दाखल होत असतात. या काळात वाहनांमधून मोठ्या आवाजात गाणी लावणे, क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींना बसवणे, रस्त्यावर वाहन थांबवून हुल्लडबाजी करणे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माळेगाव पोलिसांनी विशेष नाकाबंदी आणि वाहन तपासणी मोहीम हाती घेतली.
पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांवर पोलिसांची नजर
माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. या वेळी काही वाहनांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करत असल्याचे आढळले, तर काही वाहनांमधून हुल्लडबाजी केली जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित वाहनचालकांवर तत्काळ कारवाई केली. एकूण ३४ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय गंभीर स्वरूपाचा नियमभंग करणाऱ्या दोन वाहनचालकांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
‘उत्सवाचा आनंद घ्या; पण नियम मोडू नका’
दहीहंडी असो अथवा आगामी गणेशोत्सव आणि इतर सण-उत्सव, उत्सव साजरा करताना नागरिकांनी कायदा व वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊ नयेत, रस्त्यावर हुल्लडबाजी करू नये आणि इतर वाहनचालक तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्सवाच्या नावाखाली वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या किंवा सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा माळेगाव पोलिसांनी दिला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम
ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस हवालदार सचिन होळकर, विजय वाघमोडे, अमजद शेख, संदीप वाघमोडे, काका पाटोळे, गणेश खंडागळे आणि विकास राखुंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दहीहंडीचा उत्साह जल्लोषात साजरा करताना नियमांचे उल्लंघन करून स्वतःसह इतरांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांना माळेगाव पोलिसांनी दिलेला हा इशारा मानला जात आहे.

