मावळ, पुणे प्रतिनिधी
बैलगाडा शर्यतीच्या घाटात जवळपास दशकभर आपल्या वेगाची दहशत निर्माण करणारा आणि हजारो बैलांमध्ये सातत्याने अव्वल ठरणारा ‘ओम्या’ अखेर काळाच्या पडद्याआड गेला. २७ ऑगस्ट रोजी अचानक त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने मालक रामनाथ वारंगे यांच्यासह ओम्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. शर्यतीच्या मैदानात आपल्या वेगाने मालकाला लाखो रुपयांची बक्षिसे मिळवून देणारा ओम्या आता कायमचा शांत झाला आहे.
शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणून बैलाकडे पाहिले जाते. आधुनिक शेतीत ट्रॅक्टरचे महत्त्व वाढले असले, तरी दारी उत्तम बैलजोडी असणे ही आजही शेतकऱ्याच्या प्रतिष्ठेची बाब मानली जाते. मात्र, मावळमधील रामनाथ वारंगे यांच्या ओम्या या बैलाची कहाणी याही पलीकडची आहे. शेतातील कामापासून सुरू झालेला त्याचा प्रवास बैलगाडा शर्यतीच्या घाटातील ‘राजा’ होण्यापर्यंत पोहोचला. आपल्या वेगाच्या जोरावर ओम्याने मालकाला मोठमोठी बक्षिसे मिळवून दिली आणि पंचक्रोशीत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली.
शर्यत म्हणजे ‘ओम्या’!
सुमारे २०१६-१७ च्या काळात जालना जिल्ह्यातून मैसूर जातीचा हा रुबाबदार बैल रामनाथ वारंगे यांनी विकत आणला. सुरुवातीला तो सर्वसामान्य बैलांप्रमाणे शेतातील कामांमध्ये सहभागी होत होता. मात्र, त्याच्यातील वेग आणि ताकद लक्षात आल्यानंतर त्याला बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरविण्यात आले.
२०१७ पासून ओम्याने बैलगाडा शर्यतीच्या घाटात धावण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वर्षांतच ‘घाटात ओम्या उतरला की पहिला नंबर कोणाचा?’ या प्रश्नाचे उत्तर जवळपास निश्चित झाले. ओम्याच्या नावाभोवती विजयाचे एक वेगळेच वलय निर्माण झाले.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर स्पर्धांना वेग आला आणि ओम्यानेही आपला दबदबा कायम ठेवला. हजारो बैलांच्या सहभागाच्या स्पर्धांमध्ये त्याने अनेकदा अव्वल क्रमांक पटकावला. तब्बल १२०० गाड्यांच्या सहभागातून पहिला क्रमांक मिळविण्याची कामगिरीही त्याच्या नावावर असल्याचे सांगितले जाते.
एका शर्यतीत अवघ्या ११.२२ सेकंदांत अंतर पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावल्याची कामगिरीही ओम्याने केली होती. त्याच्या वेगामुळे मैदानावर उपस्थित प्रेक्षकांमध्ये उत्साहाची लाट उसळायची. ओम्याची धाव सुरू झाली की घाटातील वातावरणच बदलून जायचे.
सात थारपासून ट्रॅक्टरपर्यंत बक्षिसांची बरसात
ओम्याच्या विजयी कामगिरीमुळे रामनाथ वारंगे यांना मिळालेल्या बक्षिसांची यादीही तितकीच मोठी आहे. सहा-सात थार गाड्या, दोन स्कॉर्पिओ, दोन ते तीन जेसीबी, आठ ट्रॅक्टर, असंख्य दुचाकी, चांदीची गदा आणि शेकडो ट्रॉफी अशा स्वरूपात त्याने मालकाच्या पदरात बक्षिसे टाकली.
ओम्याने केवळ शर्यती जिंकल्या नाहीत, तर आपल्या मालकाला आर्थिकदृष्ट्याही सक्षम केले. एका बैलाच्या वेगाने आणि सातत्यपूर्ण कामगिरीने घरात संपत्ती आली, नाव मिळाले आणि परिसरात वारंगे कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली.
म्हणूनच ओम्या हा रामनाथ वारंगे यांच्यासाठी केवळ शर्यतीचा बैल नव्हता. तो त्यांच्या कुटुंबाचा एक सदस्य बनला होता.
विशेष आहार, कुटुंबातील सदस्यासारखी निगा
ओम्याची शर्यतीतील कामगिरी टिकवण्यासाठी त्याच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जात होते. उडीद डाळ, शेंगदाण्याची पेंड, खारीक, तूप, अंडी आणि बदाम यांसारखा पौष्टिक आहार त्याला दिला जात असे. त्याची नियमित काळजी घेतली जात होती.
शर्यतीच्या मैदानात ओम्या कितीही आक्रमकपणे धावत असला, तरी घरात मात्र तो कुटुंबातील सदस्याप्रमाणेच होता. त्याच्या स्वभावाची, खाण्यापिण्याची आणि दैनंदिन सवयींची घरातील प्रत्येकाला सवय झाली होती.
पाणी प्यायल्यानंतर अर्ध्या तासातच अनर्थ
२७ ऑगस्टचा दिवस मात्र वारंगे कुटुंबासाठी काळा दिवस ठरला. नेहमीप्रमाणे ओम्याने पाणी प्यायले. त्यानंतर काही वेळ तो निवांत बसला होता. पुढे तो शिंगाने माती उकरत होता. मात्र, त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिस्थिती अचानक बदलली.
ओम्या निपचित पडला. त्याची जीभ बाहेर आली होती आणि दात हलत असल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. तपासणीनंतर विषारी दंशामुळे ओम्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांनी नमूद केले.
ओम्याच्या अचानक जाण्याने वारंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
संपत्तीपेक्षा मालकाला आठवतोय ‘ओम्या’
ज्या बैलाच्या धावण्याने हजारो प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे, ज्याच्या प्रत्येक विजयाने मालकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलायचा आणि ज्याने असंख्य बक्षिसांच्या रूपाने मालकाला संपन्न केले, तोच ओम्या आज कायमचा शांत झाला आहे.
ओम्याच्या गळ्यात कधी विजयाच्या माळा पडायच्या. त्याच्या नावाने शर्यतीच्या घाटात जल्लोष व्हायचा. त्याच्या धावण्याची चर्चा पंचक्रोशीत व्हायची. मात्र, आज त्याच ओम्याला अश्रूंनी निरोप देण्याची वेळ रामनाथ वारंगे यांच्यावर आली आहे.
ओम्याने मिळवून दिलेल्या गाड्या, ट्रॅक्टर, जेसीबी, ट्रॉफी किंवा अन्य बक्षिसांपेक्षा आज वारंगे यांना आठवतोय तो केवळ त्यांचा लाडका ओम्या. शेतातील सहकारी, शर्यतीतील साथीदार आणि कुटुंबातील सदस्य म्हणून जवळ आलेल्या ओम्याच्या आठवणीच आता त्यांच्या सोबत राहणार आहेत.
‘शर्यत म्हणजे ओम्या आणि ओम्या म्हणजे शर्यत’ अशी ओळख निर्माण करणारा हा भारतकेसरी बैलगाडा शर्यतीच्या मैदानातून कायमचा निवृत्त झाला असला, तरी त्याच्या विजयाच्या कहाण्या आणि त्याने मालकाला मिळवून दिलेला लौकिक मावळच्या बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे.

