पुणे प्रतिनिधी
पुणे : प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील वडकी येथील औषध विक्रीचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तत्काळ प्रभावाने रद्द केले आहेत. ‘रिॲक्टिन प्लस’ या औषधाच्या पॅकेजिंगवर नियमबाह्य जाहिरात केल्यासह औषधांच्या साठवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. संबंधित औषधाचा साठाही बाजारातून मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एफडीएकडून जून २०२६ मध्ये वडकी येथील सिप्लाच्या मुख्य गोदामाची अचानक तपासणी करण्यात आली होती. या वेळी ‘शेड्युल एच’मध्ये समाविष्ट असलेल्या ‘रिॲक्टिन प्लस’ या औषधाच्या पॅकेजिंगवर ‘अनाल्जेसिक व अँटीपायरेटिक’ असा मजकूर जाहिरातीच्या स्वरूपात छापण्यात आल्याचे आढळले. औषधांच्या पॅकेजिंगवर अशा प्रकारे नियमबाह्य जाहिरात करणे हे ‘औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियमां’चे उल्लंघन असल्याचे एफडीएच्या निदर्शनास आले.
अशा जाहिरातीमुळे नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता असून, त्यामुळे ‘सेल्फ-मेडिकेशन’चे प्रमाण वाढून सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप एफडीएने नोंदविला. त्यानंतर संबंधित औषधाचा साठा बाजारातून तातडीने मागे घेण्याचे आदेश देण्यात आले.
तपासणीदरम्यान औषधांच्या साठवणुकीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याचेही आढळले. काही औषधे थेट जमिनीवर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. औषधांच्या सुरक्षित साठवणुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याने एफडीएने कंपनीविरुद्ध कठोर भूमिका घेत औषध विक्रीचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली.
नागरिकांचे आरोग्य आणि औषधांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. ‘आरोग्याशी खेळाल तर कठोर कारवाई!’ असा स्पष्ट संदेश देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या औषध उत्पादक व विक्रेत्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

