पुणे प्रतिनिधी
पुण्यात पाऊल ठेवताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाजपला पहिला दणका दिला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पुण्यात आलेल्या अमित ठाकरे यांनी शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या पाहणीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पाहिला. मोदींच्या फोटोवर अमित ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांच्या सूचनेवरून मनसे कार्यकर्त्यांनी पुढच्याच क्षणी मोदींचा फोटो भिंतीवरून खाली उतरवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, भाजप-मनसे संघर्षाला नवा तडका मिळाला आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ‘राजपुत्र’ मैदानात
राज्यातील महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी अमित ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. ‘जेन-झी’ पिढीतील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुण्यात सोमवारी या दौऱ्याला सुरुवात झाली.
पुण्यातील तब्बल सात महाविद्यालयांना अमित ठाकरे भेट देणार असून, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत. शैक्षणिक संस्थांमधील गैरव्यवस्था, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, वसतिगृहांची अवस्था, खानावळीतील जेवण, स्वच्छतागृहे आणि सुरक्षाव्यवस्था या प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
वसतिगृहाची दुरवस्था पाहून संताप
पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचल्यानंतर अमित ठाकरे यांनी वसतिगृह, खानावळ आणि स्वच्छतागृहांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधताच तक्रारींचा अक्षरशः पाढाच त्यांच्यासमोर वाचण्यात आला.
वसतिगृहातील अस्वच्छता, खराब स्वच्छतागृहे, खानावळीत मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अपुरी व्यवस्था अशा अनेक प्रश्नांकडे विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे यांचे लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर अमित ठाकरे यांनी महाविद्यालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल तर त्याचा जाब विचारलाच जाईल, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
शिवरायांच्या शेजारी मोदींचा फोटो; अमित ठाकरेंचा संताप
याच पाहणीदरम्यान एका विद्यार्थ्याने कार्यालयातील छायाचित्रांकडे अमित ठाकरे यांचे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला असल्याचे विद्यार्थ्याने सांगितले.
मोदींच्या छायाचित्राकडे पाहिल्यानंतर अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना संबंधित फोटो हटवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर काही क्षणांतच मनसे कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो भिंतीवरून खाली उतरवला.
या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याची चर्चा आता विद्यार्थी प्रश्नांपेक्षा राजकीय वर्तुळात अधिक रंगू लागली आहे.
भाजप संतप्त; ‘घटनात्मक पदाचा अवमान’?
मोदींचा फोटो हटवल्याच्या घटनेवर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ भाजपचे नेते नसून देशाचे पंतप्रधान आहेत. सरकारी संस्थांमध्ये घटनात्मक पदांवरील व्यक्तींच्या छायाचित्रांबाबत प्रोटोकॉल असतो, असा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
अमित ठाकरेंच्या या कृतीचा भाजप नेत्यांनी निषेध केला असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही पुढे आली आहे. त्यामुळे पुण्यातील एका महाविद्यालयातील फोटो काढण्याच्या घटनेवरून भाजप आणि मनसेमध्ये नवा राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
अमित ठाकरेही मागे हटण्याच्या तयारीत नाहीत!
भाजपच्या टीकेनंतरही अमित ठाकरे यांनी आपली भूमिका मवाळ केलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण करण्याऐवजी त्यांच्या विचारांचा सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका मनसेकडून मांडली जात आहे.
भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली तरी त्याला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे अमित ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
‘स्कूल ठीक करो’नंतर मनसेचा ‘जेन-झी’वर फोकस
‘कॉक्रोच जनता पार्टी’ने ‘जेन-झी’ तरुणांच्या प्रश्नांवर आंदोलन उभे केल्यानंतर राज्यातील प्रादेशिक पक्षांनीही तरुणाईकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. मनसेनेही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राजकीय अजेंड्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शाळांच्या दुरवस्थेविरोधात ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबविण्यात येत आहे. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करत आहेत.
‘शैक्षणिक भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडणार’
विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षण संस्थांमधील गैरव्यवस्था आणि कथित शैक्षणिक भ्रष्टाचार याविरोधात मनसे आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. पुण्यातील दौऱ्यात अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला असून, शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराची ‘दहीहंडी’ फोडण्याचा इशारा दिला आहे.
त्यामुळे अमित ठाकरेंचा हा दौरा आगामी काळात सरकार आणि सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पुण्यात दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोदींच्या फोटोवरून निर्माण झालेल्या वादामुळे मनसे आणि भाजपमधील संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू झालेला अमित ठाकरेंचा दौरा आता भाजपविरोधातील राजकीय संघर्षाचे नवे मैदान ठरणार का? याचे उत्तर आगामी काळात मिळणार आहे.

