मुंबई प्रतिनिधी
राज्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेनंतर प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीत आपले नाव आहे की नाही, याची मतदारांनी स्वतः तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रारूप यादीत नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता, वय, छायाचित्र आदी तपशीलात त्रुटी असल्यास संबंधित मतदारांना दावा अथवा हरकत दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे.
प्रारूप मतदार यादी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पाहता येणार आहे. याशिवाय संबंधित बीएलओकडूनही (बूथ लेव्हल ऑफिसर) मतदार यादीतील नावाची माहिती घेता येईल.
सर्वप्रथम नाव तपासा
३१ ऑगस्टला प्रारूप यादी उपलब्ध झाल्यानंतर मतदारांनी केवळ आपले नाव आहे की नाही, एवढीच तपासणी न करता मतदार यादीतील संपूर्ण तपशील पडताळून पाहणे आवश्यक आहे. नावाची स्पेलिंग, वय किंवा जन्मतारीख, छायाचित्र, पत्ता, मतदार ओळख क्रमांक (EPIC) तसेच मतदान केंद्राची माहिती योग्य आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी.
यापैकी कोणत्याही तपशिलात चूक आढळल्यास संबंधित मतदाराला दुरुस्ती करण्याची संधी आहे. नाव, पत्ता, वय, छायाचित्र आदी तपशील दुरुस्त करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येईल.
नाव नसल्यास ३० सप्टेंबरपर्यंत दावा
प्रारूप यादीत आपले नाव आढळले नाही तरी मतदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यानंतर संबंधित दावे-हरकतींची तपासणी करून आवश्यक ती सुनावणी घेतली जाणार आहे.
प्रारूप यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६ आवश्यक कागदपत्रे आणि घोषणापत्रासह सादर करावा लागणार आहे. त्यासाठी आधारकार्ड, जन्मतारीखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, २०२५च्या मतदार यादीतील नावाचा तपशील दर्शविणारा स्क्रीनशॉट किंवा छायाचित्र तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो अशी कागदपत्रे तयार ठेवणे उपयुक्त ठरणार आहे.
२०२५मध्ये नाव होते, यंदा गायब?
विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान काही मतदारांची नावे प्रारूप यादीत दिसून न आल्यास त्यामागील कारण तपासण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२५च्या मतदार यादीत नाव असताना २०२६च्या प्रारूप यादीत नाव नसलेल्या मतदारांसाठी महाराष्ट्राच्या सीईओच्या एसआयआर पोर्टलवर एएसडीडी (Absent/Shifted/Dead/Duplicate) तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नाव गायब असल्याचे दिसताच निष्कर्ष काढण्याऐवजी संबंधित नोंद आणि कारण तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अंतिम यादीपूर्वी संधी
विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी ही अंतिम यादी नसते. त्यामुळे प्रारूप यादीत नाव वगळले गेले असल्यास पात्र मतदारांना दावा दाखल करून आपले नाव पुन्हा समाविष्ट करून घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे मतदार यादीतील चुकीचे तपशील दुरुस्त करण्यासाठीही निर्धारित प्रक्रियेतून अर्ज करता येणार आहे.
त्यामुळे ३१ ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि संपूर्ण तपशील तपासावा. त्रुटी आढळल्यास निर्धारित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी, असे आवाहन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
मतदारांसाठी महत्त्वाच्या तारखा :
३१ ऑगस्ट २०२६ : एसआयआरची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर : दावे व हरकती दाखल करण्याची मुदत
नमुना ६ : नवीन नाव नोंदणी/वगळलेले पात्र नाव समाविष्ट करण्यासाठी
नमुना ८ : नाव, पत्ता, वय, फोटो आदी तपशीलातील दुरुस्तीसाठी
तपासणी : महाराष्ट्र सीईओ संकेतस्थळ, भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ किंवा संबंधित बीएलओकडून

