मुंबई प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पश्चिमेतील जिजामाता उद्यानासमोर भरधाव इनोव्हा क्रिस्टा कारने रस्ता ओलांडणाऱ्या आठ वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याला धडक दिल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (३० ऑगस्ट) दुपारी घडली. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या अंशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालक मेघा रावल या महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा क्रिस्टा कारने त्याला धडक दिली. कारचालक महिला वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असल्याचा आरोप आहे. तसेच निष्काळजीपणे आणि भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
धडकेनंतर अंश गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला हॉली फॅमिली रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार ताब्यात घेत चालक महिलेला अटक केली.
अंशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. आठ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूमुळे गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुंबईतील रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

