मुंबई प्रतिनिधी
मुंबई : दुर्धर आजारांशी झुंज देत उपचारांच्या वेदना सहन करणाऱ्या कर्करोगग्रस्त चिमुकल्यांसोबत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी रक्षाबंधन साजरे करत संवेदनशील सामाजिक संदेश दिला. माहीम येथील रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडियामध्ये झालेल्या या सोहळ्यात महापौरांनी मुलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांना भेटवस्तू दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. चिमुकल्यांच्या हातांनी तयार केलेल्या राख्यांनी या सोहळ्यात जिद्द, प्रेम आणि जगण्याची नवी आशा उमटवली.

कर्करोगावरील उपचारादरम्यान सुई, सलाईन आणि किमोथेरपीच्या असह्य वेदनांना रोज सामोरे जाणाऱ्या निष्पाप चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर रक्षाबंधनाच्या निमित्ताने आनंदाचे हसू फुलले. हा हळवा प्रसंग अनुभवताना उपस्थितांचेही डोळे पाणावले. वैद्यकीय उपचारांच्या कठीण प्रवासात असलेल्या या बालकांना केवळ शब्दांची सहानुभूती नव्हे, तर प्रत्यक्ष सहवेदना आणि मदतीचा हात आवश्यक असल्याचा कृतिशील संदेश महापौरांनी आपल्या भेटीतून दिला.
महापौर रितू तावडे यांनी गुरुवारी (दि. २७) गंभीर आजारांवर उपचार घेत असलेल्या मुलांसमवेत रक्षाबंधन साजरे केले. मुलांच्या चेहऱ्यावरील निष्पाप हास्य पाहून त्या भावुक झाल्या. त्यांनी मुलांना मायेने जवळ घेत मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलांनी स्वतःच्या नाजूक हातांनी तयार केलेल्या राख्या महापौरांना आणि एकमेकांना बांधल्या. या क्षणी उपस्थित पालक आणि डॉक्टरांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू तरळले.

“उपचारांच्या तीव्र यातना सहन करणाऱ्या या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर राखीचा आनंद आणि डोळ्यांतील जगण्याची दुर्दम्य आशा पाहून मी निःशब्द झाले आहे. हा रेशमी धागा केवळ संरक्षणाचे वचन नसून तुम्ही या लढाईत एकटे नाही, संपूर्ण मुंबई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, या दृढ विश्वासाची साक्ष आहे,” असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.
दूरवरच्या खेड्यापाड्यांतून आपल्या मुलांवर उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या कुटुंबांना निवास आणि खाण्यापिण्याचा खर्च पेलणे अनेकदा कठीण होते. अशा कुटुंबांसाठी रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडिया मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. माहीम येथील संस्थेतील १६ सुसज्ज खोल्या आणि स्वयंपाकघराची पाहणी करून महापौरांनी समाधान व्यक्त केले. येथे आई स्वतःच्या हाताने बाळासाठी आवडीचे जेवण तयार करू शकते आणि त्यामुळे आजारी मुलाला घरच्या वातावरणाचा मानसिक दिलासा मिळतो, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कर्करोगग्रस्त बालकांच्या पाठीशी मुंबई महानगरपालिका सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत महापौरांनी गरजू कुटुंबांना महापौर वैद्यकीय मदत कक्षामार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संस्था संचालकांना दिले.
महापौरांच्या या आत्मीय भेटीमुळे उपचारांच्या खडतर प्रवासातून जाणाऱ्या बालकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नवे मानसिक व भावनिक बळ मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. यावेळी रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस इंडियाचे संचालक निशेत पांडे, सुलक्षणा मुखर्जी, संस्थेचे कर्मचारी आणि बालरुग्णांचे कुटुंबीय उपस्थित होते.

