मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू असताना घाटकोपर येथील संत मुक्ताबाई रुग्णालयाबाहेर नवजात कन्येला घेऊन एक दाम्पत्य घरी जाण्यासाठी रिक्षाची प्रतीक्षा करीत होते. तासभर वाट पाहूनही रिक्षा न मिळाल्याने आईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. याच वेळी रुग्णालयाची पाहणी करून बाहेर पडलेल्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.
नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून महापौर तावडे यांनी थांबून संबंधित महिलेची विचारपूस केली. परिस्थिती लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीचा हात पुढे केला. बाळंतिणीला आणि तिच्या नवजात कन्येला महापौरांच्या वाहनातून सुरक्षितपणे खैरानी मार्ग, कुर्ला येथील त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.
या प्रवासादरम्यान महापौर तावडे यांनी नवजात कन्येला आपल्या कुशीत घेतले. घरी पोहोचल्यानंतर बाळाला तिच्या आईकडे सोपवून त्यांनी आई-बाळाला शुभेच्छा दिल्या. तसेच नवजात कन्येला प्रेमाने भेट देत तिचे स्वागत केले.
रुग्णालयातून जन्मानंतर पहिल्यांदाच घराकडे निघालेल्या या चिमुकलीचा पहिला प्रवास महापौरांच्या वाहनातून झाल्याने हा प्रसंग कुटुंबासाठी भावनिक आणि कायम स्मरणात राहणारा ठरला. पदापेक्षा माणुसकीला महत्त्व देत महापौरांनी केलेल्या या मदतीचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
‘कन्या हीच शक्ती’ आणि ‘माणुसकी हाच धर्म’ हा संदेश देणारा हा प्रसंग ठरला असून, मोठेपण पदात नसून ते मनात असते, हे महापौर रितू तावडे यांनी कृतीतून दाखवून दिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

