सातारा प्रतिनिधी
सातारा : टीव्ही चॅनलचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी सातारा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सातारा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन देऊन प्रकरणाची वस्तुस्थिती सांगितली.
चार दिवसांपूर्वी पत्रकार मंदार गोंजारी हे वार्तांकनासाठी पुण्यातील सीओईपी महाविद्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ही बाब महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर गोंजारी यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मंदार गोंजारी हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून गेल्या अनेक वर्षांपासून ते तटस्थपणे आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करत आहेत. विद्यार्थ्यांनी धाडसाने मांडलेल्या प्रश्नांची दखल घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढणे अपेक्षित असताना पत्रकाराविरोधातच तक्रार दाखल करण्यात आल्याने पत्रकार संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पत्रकाराविरोधात करण्यात आलेली कारवाई ही माध्यम स्वातंत्र्यावर घाला घालणारी असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न सकारात्मकपणे स्वीकारून ते मार्गी लावावेत, तसेच पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली चुकीची तक्रार तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी सातारा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, उपाध्यक्ष उमेश बांबरे, खजिनदार अमित वाघमारे, चंद्रकांत देवरुखकर, रिझवान सय्यद, मीना शिंदे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रतीक भद्रे, विनीत जवळकर, सिद्धार्थ लाटकर आणि रघुनाथ कुंभार उपस्थित होते.

