उमेश गायगवळे 9769020286
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर घडलेली चांदगुडे कुटुंबाची शोकांतिका महाराष्ट्राच्या काळजावर ओरखडा उमटवून गेली आहे. एकोणीस वर्षांचा कुणाल, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता, एकाच कुटुंबातील तीन जीवांचा झालेला अंत हा केवळ दुर्दैवी प्रसंग म्हणून विसरून चालणार नाही. या घटनेमागील नेमके कारण काय होते, कुणालच्या मनात त्या क्षणी नेमके कोणते वादळ घोंघावत होते, कौटुंबिक संघर्ष किती होता, आर्थिक किंवा इतर कोणत्या कारणांचा त्यात सहभाग होता, याचा तपास यंत्रणा शोध घेईल. नातेवाइकांनी केलेले आरोप खरे की खोटे, हेही तपासातूनच स्पष्ट होईल. परंतु या सर्वांपलीकडे एक भयंकर सत्य आपल्यासमोर उभे ठाकले आहे, आपण आपल्या मुलांना सुखसोयी देताना त्यांना जीवन जगण्याची ताकद देत आहोत का?

खवड्या डोंगरावर आई आपल्या मुलाला वाचविण्यासाठी आर्तपणे विनवणी करीत होती, हात जोडत होती, त्याच्यापुढे असहायपणे उभी होती, असे समोर आलेले चित्र कोणत्याही संवेदनशील माणसाला हादरवून सोडणारे आहे. आईचे डोळे, तिची विनवणी आणि मुलाच्या मनात निर्माण झालेली भिंत, या तिन्हींच्या मध्ये त्या क्षणी किती मोठी दरी निर्माण झाली होती, याची कल्पना करणेही असह्य आहे. एकीकडे आईला मुलगा गमावण्याची भीती आणि दुसरीकडे मुलाच्या मनात काय चालले आहे याचा थांगपत्ता नसलेले असहाय कुटुंब. ही केवळ एका घराची अवस्था आहे असे समजणे हीच आपली सर्वांत मोठी चूक ठरेल.
आज महाराष्ट्रातील असंख्य घरांमध्ये अशीच अदृश्य दरी निर्माण होत आहे. घरात मुलगा आहे, त्याच्या हातात अत्याधुनिक मोबाईल आहे, खोलीत महागडे उपकरण आहे, खिशात पैसे आहेत; पण त्याच्या मनात काय आहे, हे विचारायला आई-वडिलांकडे वेळ नाही. मुलगा तासन्तास मोबाईलमध्ये असतो, सोशल मीडियावर रमतो, गेम खेळतो, मित्रांच्या जगात जगतो आणि घरातील माणसांशी दोन शब्द बोलत नाही. पालकांना वाटते, ‘मुलगा घरातच आहे, म्हणजे सुरक्षित आहे.’ पण शरीर घरात आणि मन कुठे भटकत आहे, याचा विचार कोण करणार?
आपण मुलांना जन्म देतो; पण त्यांचे मन घडविण्याची जबाबदारी विसरतो. त्यांच्या प्रत्येक हट्टाला ‘हो’ म्हणतो. त्यांना दुःख होऊ नये म्हणून प्रत्येक नकार टाळतो. त्यांच्या हातात पैसे देतो, महागडे मोबाईल देतो, गाडी देतो, ब्रँडेड वस्तू देतो. आणि मग एखाद्या दिवशी परिस्थितीने ‘नाही’ म्हटले, तर त्या ‘नाही’चा धक्का सहन करण्याची ताकदच मुलांमध्ये उरलेली नसते.
इथे प्रश्न आयफोनचा नाही. प्रश्न आहे त्या आयफोनपेक्षा मुलाच्या मनाला आपण किती किंमत दिली, याचा!
महागडा मोबाईल घेणे हा गुन्हा नाही. आधुनिक तंत्रज्ञान वापरणे चुकीचे नाही. आर्थिक क्षमता असेल तर कोणालाही आपल्या आवडीच्या वस्तू घेण्याचा अधिकार आहे. पण ऐपत नसताना केवळ दिखाव्यासाठी, मित्रांकडे आहे म्हणून किंवा सोशल मीडियावर आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी एखादी वस्तू मिळविण्याचा अट्टाहास धरणे आणि ती मिळाली नाही तर जीवनच निरर्थक वाटू लागणे, ही मानसिकता धोक्याची घंटा आहे.
आज मुलांना ‘माझ्याकडे काय आहे?’ यापेक्षा ‘दुसऱ्याकडे काय आहे?’ याची चिंता अधिक आहे. सोशल मीडिया हा वास्तव नसून सजवलेला देखावा आहे, हे सांगायला आपण कमी पडलो. दुसऱ्याचे चांगले घर दिसते; त्यामागचे कर्ज दिसत नाही. दुसऱ्याची महागडी गाडी दिसते; त्यामागचा संघर्ष दिसत नाही. दुसऱ्याचा आयफोन दिसतो; त्याच्या आयुष्यातील चिंता दिसत नाहीत. पण आपली मुले त्या बनावट जगाशी स्वतःची तुलना करू लागतात. आणि तुलना वाढली की न्यूनगंड वाढतो. न्यूनगंड वाढला की राग, अस्वस्थता आणि एकाकीपणा वाढतो.

पालकांनीही या प्रश्नापासून पळता कामा नये. ‘आम्ही मुलासाठी एवढे केले’ हा युक्तिवाद आता पुरेसा नाही. मुलासाठी पैसा खर्च करणे सोपे आहे; मुलासाठी वेळ खर्च करणे कठीण आहे. मुलाला मोबाईल देणे सोपे आहे; त्याच्यासोबत बसून त्याच्या मनातील प्रश्न ऐकणे कठीण आहे. त्याला शिकवणी लावणे सोपे आहे; पण तो मानसिकदृष्ट्या ठीक आहे की नाही, हे जाणून घेणे कठीण आहे.
घरात रोज संवाद होतो का? मुलाला ‘आज काय झाले?’ हा प्रश्न विचारला जातो का? त्याच्या उत्तराला मध्येच तोडले जात नाही ना? तो एखादी चूक सांगतो तेव्हा त्याला शिव्या मिळतात की समजून घेतले जाते? त्याचे मित्र कोण आहेत, तो कोणाशी बोलतो, त्याच्या मनात कोणती भीती आहे, त्याला कोणत्या गोष्टीचा दबाव आहे, हे पालकांना माहिती आहे का? हे प्रश्न आता प्रत्येक घराने स्वतःला विचारले पाहिजेत.
आणखी एक कठोर सत्य स्वीकारावे लागेल. लाड आणि संस्कार यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. मुलाच्या प्रत्येक मागणीपुढे मान तुकवणे म्हणजे प्रेम नव्हे. मुलाला प्रत्येक वेळी जिंकू देणे म्हणजे त्याला जीवनासाठी तयार करणे नव्हे. उलट, आयुष्यात काही गोष्टी मिळणार नाहीत, काही इच्छा अपूर्ण राहतील, काही वेळा अपयश येईल आणि काही वेळा नकार ऐकावा लागेल, हे शिकवणे हीच खरी पालकांची जबाबदारी आहे.
ज्या मुलाला बालपणी प्रत्येक रडण्यावर खेळणे मिळते, प्रत्येक हट्टावर वस्तू मिळते आणि प्रत्येक चुकीवर पालक पांघरूण घालतात, त्याच मुलाला तरुणपणी वास्तवाचा पहिला धक्का बसला की तो कोसळू शकतो. कारण त्याला संघर्षाची सवयच नसते. जीवन म्हणजे केवळ सुविधा नाही; जीवन म्हणजे संघर्ष, अपयश, प्रतीक्षा, संयम आणि पुन्हा उभे राहण्याची जिद्द.
म्हणूनच शाळा-महाविद्यालयांची जबाबदारीही मोठी आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. अभ्यासात अचानक रस कमी होणे, सतत एकटे राहणे, चिडचिड वाढणे, झोपेच्या सवयी बदलणे, मित्रांपासून दूर जाणे, सतत नकारात्मक बोलणे किंवा स्वतःच्या आयुष्याबद्दल निराशा व्यक्त करणे, हे संकेत दुर्लक्षित करता कामा नयेत. ‘ही मुलांची नाटकं आहेत’ म्हणून त्याकडे पाहणारा समाज उद्या मोठी किंमत मोजू शकतो.

मुलांना मानसिक आरोग्याबद्दल बोलायला शिकवावे लागेल. ‘समस्या आली म्हणजे तू कमजोर नाहीस’ हे त्यांना सांगावे लागेल. मदत मागणे ही लाज नाही, हे समजावून सांगावे लागेल. पालकांनीही मुलांच्या मनातील वेदनेला ‘नाटक’, ‘हट्ट’ किंवा ‘लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न’ म्हणून हिणवणे बंद केले पाहिजे.
खवड्या डोंगराच्या घटनेतून आणखी एक गंभीर प्रश्न समोर येतो, कुटुंबातील जुन्या वादांचा मुलांवर किती परिणाम होतो? नात्यांतील ताण, पालकांमधील संघर्ष, आजी-आजोबांशी दुरावा, घरातील सततची भांडणे, आरोप-प्रत्यारोप यांचे पडसाद मुलांच्या मनावर उमटत असतात. मुलगा काही बोलत नाही म्हणून त्याला काही जाणवत नाही, हा भ्रम आहे. घरातील प्रत्येक शब्द, प्रत्येक भांडण आणि प्रत्येक कटुता त्याच्या मनात कुठेतरी साठत असते.
म्हणून कुटुंब वाचवायचे असेल तर संवाद वाचवावा लागेल. नात्यांतील अहंकारापेक्षा मुलांचे भविष्य मोठे आहे, हे पालकांनी लक्षात ठेवावे. घरातील वाद असतील तर त्यांचा परिणाम मुलांवर होणार नाही याची काळजी घ्यावी. मुलाला एका पालकाविरुद्ध दुसऱ्या पालकाच्या बाजूने उभे करण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे.
आणि समाजानेही तमाशबीन होणे थांबविले पाहिजे. एखादा तरुण संकटात दिसला की मोबाईल काढून व्हिडीओ करणारे हात मदतीसाठी पुढे आले पाहिजेत. एखादा मुलगा अस्वस्थ दिसला तर त्याची खिल्ली उडवण्याऐवजी त्याच्याशी बोलणारा मित्र निर्माण झाला पाहिजे. संवेदनशीलता ही केवळ भाषणातील गोष्ट न राहता कृतीत उतरली पाहिजे.
या घटनेनंतर कुणालच्या हातात आयफोन होता की नव्हता, त्याचा हट्ट काय होता, घरात नेमका कोणता वाद होता, या प्रश्नांवर चर्चा होईल. तपासातून सत्य समोर येईल. पण समाजाने त्यापेक्षा मोठा प्रश्न विचारायला हवा, आपण आपल्या मुलांना वस्तूंच्या जगात मोठे करतो आहोत की माणूस म्हणून?
मुलांना महागडे मोबाईल द्या; पण त्यापेक्षा महागडे संस्कार द्या. त्यांना स्वातंत्र्य द्या; पण जबाबदारीची जाणीव द्या. पैसा द्या; पण पैशाचे मोल समजवा. त्यांची स्वप्ने पूर्ण करा; पण स्वप्ने अपूर्ण राहिली तरी जगता येते, हे शिकवा. त्यांना स्पर्धा शिकवा; पण दुसऱ्याच्या यशाने स्वतःचा पराभव होत नाही, हेही सांगा.

खवड्या डोंगरावरचा तो प्रसंग विसरणे सोपे आहे. काही दिवस बातम्या चालतील, चर्चा होतील, आरोप-प्रत्यारोप होतील आणि मग समाज पुढच्या सनसनाटी बातमीकडे वळेल. पण एखाद्या घरात आजही एखादा मुलगा शांत बसला असेल, एखादी मुलगी सतत मोबाईलमध्ये हरवली असेल, एखादा तरुण आपल्या पालकांशी बोलत नसेल, एखादे मूल एखाद्या हट्टासाठी आतून तुटत असेल, तर त्या घराने आजच सावध झाले पाहिजे.
मुलांच्या हातातून मोबाईल काढण्यापेक्षा त्यांच्या मनातील अंधार दूर करणे अधिक गरजेचे आहे.
खवड्या डोंगरावर घडलेली शोकांतिका केवळ बातमी बनून उद्या विसरली जाऊ नये. ती प्रत्येक घराच्या दारावर उभा असलेला गंभीर इशारा ठरली पाहिजे. अट्टाहासाला संस्कारांची जोड, उपभोगाला विवेकाची जोड आणि स्वातंत्र्याला जबाबदारीची जोड दिली नाही, तर आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या पुढच्या पिढीला नेमके कुठे घेऊन चाललो आहोत, हा प्रश्न प्रत्येक पालकाने, प्रत्येक शिक्षकाने आणि संपूर्ण समाजाने स्वतःला विचारण्याची हीच वेळ आहे.

