बंगळुरू :
बंगळुरू : कर्नाटकातील मांड्या परिसरात एका वृद्ध भिकारी महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या अवघ्या १० बाय १० फुटांच्या भाड्याच्या खोलीत नोटा आणि नाण्यांनी भरलेल्या तब्बल ३० हून अधिक गोण्या आढळून आल्या. या गोण्यांमध्ये ३० ते ४० लाख रुपयांपर्यंतची रोकड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, त्यापैकी रविवारी सुमारे आठ ते नऊ लाख रुपयांची मोजदाद करण्यात आली. उर्वरित गोण्यांमधील रकमेची मोजदाद अद्याप बाकी आहे.
उन्निसा असे या महिलेचे नाव असून, त्या गेल्या अनेक वर्षांपासून गुट्टालू लेआऊट परिसरातील एका मशिदीबाहेर भीक मागून उदरनिर्वाह करीत होत्या. उन्निसा आणि त्यांची बहीण दोघीही अविवाहित होत्या. बहिणीच्या मृत्यूनंतर उन्निसा एकट्याच राहत होत्या. वाढत्या वयामुळे झालेल्या आजाराने रविवारी त्यांचा मृत्यू झाला.
उन्निसा यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक त्यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर घरातील सामानाची पाहणी करताना अनेक गोण्या आढळल्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोटा तसेच नाणी असल्याचे समोर आले. अनेक वर्षांपासून भीक मागून मिळालेली रक्कम उन्निसा यांनी साठवून ठेवल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
उन्निसा यांची कुटुंबीयांकडून देखभाल होत नसल्याने स्वतःचा खर्च भागविण्यासाठी भीक मागत असल्याचे त्या स्थानिकांना सांगत असत. मशिदीत येणाऱ्या नागरिकांना त्या दररोज दिसत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर शेजाऱ्यांनी अंत्यविधीची व्यवस्था केली.
दरम्यान, घरातून सापडलेली रोकड सध्या गुट्टालू परिसरातील मशिदीच्या ताब्यात देण्यात आली आहे. मुस्लिम समाजातील नेत्यांनी उन्निसा यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली असून, उर्वरित रकमेची मोजदाद नातेवाईकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. एवढी मोठी रक्कम नेमकी कोणाकडे जाणार, याबाबत आता प्रश्न उपस्थित झाला आहे.

