सातारा प्रतिनिधी
सातारा: सातारा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला शिताफीने जेरबंद करत मोठा, थरारक पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २ जबरी चोरी, ५ घरफोडी आणि २ चोरी असे एकूण ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईदरम्यान आरोपींकडून १४ लाख रुपये किमतीचे ९ तोळे ६ ग्रॅम ८४० मिली वजनाचे सोन्याचे दागिने, ५० हजार रुपयांची एक मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेले हत्यार असा एकूण १४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची गोपनिय माहिती मिळाली होती. पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार चाँद उर्फ सुरज जालिंदर पवार (रा. काळज, ता. फलटण, जि. सातारा) हा त्याच्या साथीदारांसह मानेवाडी गावच्या हद्दीतील एका शेतात लपून बसला असल्याची माहिती मिळताच पो.नि. घोडके यांनी क्षणाचाही विलंब न करता तपास पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले.
या आदेशानुसार, दिनांक १८ जून २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर व त्यांच्या तपास पथकाने काळज आणि मानेवाडी परिसरात धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत शिताफीने वेशांतर करून या भागात सापळा रचला. आरोपी नक्की कोठे लपून बसले आहेत याचा शोध घेत असताना, पोलिसांची चाहूल लागताच सराईत गुन्हेगार चाँद उर्फ सुरज पवार याने पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकातील अधिकारी व अंमलदारांनी जिवाची कोणतीही पर्वा न करता त्याचा धाडसाने पाठलाग केला आणि आरोपीस शिताफीने पकडून ताब्यात घेतले.
ही धडक कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या यशस्वी मोहिमेत स.पो.नि. अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोउनि. परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

