स्वप्नील गाडे, गुन्हे वार्ताहर
मुंबई : मुंबईत अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) वरळी युनिटने बांद्रा पूर्वेकडील बांद्रा टर्मिनल परिसरात मोठी कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून तब्बल १० किलो १० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला असून, या अमली पदार्थाची किंमत सुमारे १० कोटी १ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई शहरात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत असताना १७ ऑगस्ट रोजी ANCच्या वरळी युनिटच्या पथकाला बांद्रा टर्मिनल परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात चरस सापडला. त्यानंतर पोलिसांनी १० किलो १० ग्रॅम चरस जप्त करत आरोपीला अटक केली.
या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या गुन्हा क्रमांक ७८/२०२६ तसेच निर्मलनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ७४४/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) सह २०(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला चरस मुंबईत नेमका कुठून आणण्यात आला होता आणि तो कोणाला वितरित केला जाणार होता, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे आणि अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष पौर्णिमा चौगुले श्रींगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या नेतृत्वाखाली वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असून, या तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

