मुंबई प्रतिनिधी
राज्यात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला/इलायची’च्या जाहिरातीद्वारे अप्रत्यक्षरीत्या पान मसाल्याचा प्रचार केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तिघांनीही संबंधित जाहिरातीतील सहभाग तात्काळ थांबवावा तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आणि वेबसाइटवरून जाहिरातीशी संबंधित प्रचारात्मक मजकूर हटवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
एफडीएने तिघांना १५ दिवसांच्या आत सविस्तर लेखी स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, याचे उत्तर मागविण्यात आले आहे. तसेच एंडोर्समेंट करार, जाहिरात मोहिमेचे तपशील, मानधनाची माहिती आणि जाहिरातीपूर्वी योग्य ती खबरदारी घेतल्याचा पुरावा याच्या प्रतीही सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
२०२४ मधील जाहिरातीवरून कारवाई
२०२४ मध्ये ‘विमल’च्या जाहिरात मोहिमेत शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिघेही एकत्र दिसले होते. या जाहिरातीमुळे ‘विमल’ या ब्रँडशी तिन्ही कलाकारांचा थेट संबंध निर्माण होतो आणि त्यातून प्रतिबंधित पान मसाल्याचे अप्रत्यक्ष किंवा पर्यायी प्रमोशन होते का, असा गंभीर प्रश्न एफडीएने उपस्थित केला आहे.
एफडीएच्या प्राथमिक तपासणीनुसार जाहिरातीतील सादरीकरण, संवाद आणि उत्पादनाच्या नावाचा वापर यामुळे ती केवळ ‘इलायची’ची जाहिरात आहे की प्रतिबंधित पान मसाल्याच्या उत्पादनाची अप्रत्यक्ष जाहिरात आहे, याची चौकशी आवश्यक ठरते. ‘विमल’ हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाला उत्पादनाशी संबंधित असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
१५ दिवसांत कागदपत्रांसह उत्तर
एफडीएने तिघांकडून जाहिरात करार, मोहिमेचे ‘कॅम्पेन ब्रीफ’, मानधनाचा तपशील आणि जाहिरातीपूर्वी संबंधित उत्पादनाची कायदेशीर स्थिती तपासल्याचा पुरावा मागविला आहे. तसेच भविष्यात अशा जाहिरातींमध्ये सहभागी होण्यापूर्वी आवश्यक ती दक्षता घेण्याचे संकेतही या कारवाईतून देण्यात आले आहेत.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसंदर्भातील ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच संबंधित सेलिब्रिटींना ठरावीक कालावधीसाठी उत्पादनांच्या जाहिराती करण्यास प्रतिबंध घालण्याची तरतूदही आहे.
तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली कारवाईला वेग
एफडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला आहे. राज्यातील विविध भागांत छापे टाकून प्रतिबंधित उत्पादनांचा साठा, विक्री आणि वितरणावर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील कलम ३०(२)(अ) अन्वये १३ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार संबंधित उत्पादनाच्या निर्मिती, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घालण्यात आल्याचे एफडीएने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.
नोटीसा कुठे पाठवल्या?
एफडीएने अजय देवगण यांच्या जुहू येथील निवासस्थानी, शाहरुख खान यांच्या वांद्रे येथील ‘मन्नत’ निवासस्थानी, तर टायगर श्रॉफ यांच्या ‘टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी’च्या कार्यालयाच्या पत्त्यावर नोटिसा पाठवल्या आहेत. आता तिघांच्या लेखी स्पष्टीकरणानंतर एफडीए पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय घेणार आहे.

