मुंबई प्रतिनिधी
“हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडविणारे सरकार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचविण्यास सरकार कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील १२४ नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये तसेच उन्नतीकरण करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांचे शनिवारी (१५ ऑगस्ट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. या माध्यमातून राज्यातील विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सुविधांना अधिक बळकटी मिळणार आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले की, मंत्री आणि अधिकारी केवळ मंत्रालयात बसून निर्णय घेत नसून मेळघाट, गडचिरोली यांसारख्या दुर्गम भागांत प्रत्यक्ष जाऊन रुग्णालयांची पाहणी करीत आहेत. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि अडचणी स्पष्टपणे लक्षात येतात. त्यानंतर छोट्या समस्या तातडीने, तर मध्यम व दीर्घकालीन प्रश्न नियोजनबद्ध पद्धतीने सोडविता येतात, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती देताना शिंदे यांनी सांगितले की, सुमारे अडीच ते तीन कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होऊन हजारो महिलांना वेळेत उपचार मिळू शकले. तसेच मॅमोग्राफी व्हॅनच्या माध्यमातून स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्याची मोहीम राज्यभर अधिक व्यापक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘सिकल सेलमुक्त महाराष्ट्र’, क्षयरोग निर्मूलन, ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’, ‘अरुणोदय’ मोहीम, मातृ-शिशु आरोग्य आणि ग्रामीण आरोग्य बळकटीकरण अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
“रुग्णालये ही समाजाची पवित्र मंदिरे आहेत, तर डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी हे देवदूत आहेत. सरकारकडून उत्तम आरोग्य सुविधा उभारल्या जात आहेत. मात्र, या सुविधांचा वापर करण्याची वेळ कुणावरही येऊ नये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक निरोगी व ठणठणीत राहावा, हीच स्वातंत्र्यदिनानिमित्त माझी सदिच्छा आहे,” असे शिंदे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दौलत दरोडा, हरिश्चंद्र भोईर, शरद सोनवणे, प्रकाश सोळंके, नगराध्यक्ष अमोल पाटील, प्रधान सचिव निपुण विनायक, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी काटकर यांच्यासह राज्यभरातील लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

