सातारा प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सातारा शहरात देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्राभिमानाचे दर्शन घडले. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा साताऱ्याचे आमदार ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा दुचाकी रॅलीने शहरातील वातावरण देशभक्तिमय करून टाकले. हातात तिरंगा घेऊन हजारो नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी राजवाडा परिसरापासून पोवई नाक्यापर्यंतचा परिसर दुमदुमून गेला.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच नव्या पिढीमध्ये देशभक्तीचा संदेश पोहोचावा, या उद्देशाने या तिरंगा दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गांधी मैदान, राजवाडा परिसरातून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. दुचाकींवर तिरंगा ध्वज फडकवत मोठ्या संख्येने नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.
रॅलीच्या प्रारंभी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गोलबाग येथे थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रॅलीने मोती चौकाच्या दिशेने प्रस्थान केले. राजवाडा, गोलबाग, मोती चौक मार्गे रॅली पोवई नाक्याकडे रवाना झाली. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तिरंगा हातात घेतलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण मार्गावर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी शहराचा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला. अनेक नागरिकांनी दुचाकींवर तिरंगा ध्वज लावून रॅलीत सहभाग नोंदविला. युवकांसह ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.
रॅलीचा समारोप शिवतीर्थ, पोवई नाका येथे झाला. यावेळी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांना अभिवादन करत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला साताऱ्यात देशभक्तीचा जागर करण्यात आला.
या रॅलीत आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच हजारो नागरिक सहभागी झाले होते. रॅलीमुळे सातारा शहरात स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाची रंगत आणखी वाढली.
सातारकरांनी रॅलीला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नागरिकांचे आभार मानले. स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे आणि जवानांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रहिताची भावना प्रत्येक नागरिकाने जपावी, असा संदेश या तिरंगा रॅलीतून देण्यात आला.

